दिवाळी कुठाय?नांदेडच्या तुफानी सभेत उद्धव ठाकरे यांचा सवाल

122

सामना ऑनलाईन । नांदेड

जीएसटी कमी केली म्हणून देशात दिवाळी आली म्हणे! कुठाय दिवाळी? कुणाला दिसली दिवाळी? आधी नोटाबंदी करून लक्ष्मी ओरबाडून नेली आणि आता लोडशेडिंगमुळे सर्वत्र अंधार आहे. जनता कशाची पूजा करणार? म्हणे दिवाळी आली! शेतकरी कर्जमुक्त झालाय का? कुठाय विकास? विकासही गेला अन् सोबत प्रकाशही गेला, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारची सालटी काढली. नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशाल सभा झाली.

आमचा मित्रपक्ष. थोडी मैत्री आणि बाकी शत्रुत्व असा हा प्रकार. हा म्हणे जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. चंद्रावरून यांना मिसकॉल येतात. मंगळावरूनही येतात, आम्हाला मेंबर करून घ्या म्हणून. पण एवढय़ा वर्षांत यांना निष्ठावंताची फळी तयार करता आली नाही. या पक्षातून थोडे, त्या पक्षातून थोडे अशी यांची भिक्षांदेही चालू आहे. आमच्याशी थेट लढण्याची हिंमत यांच्यात नाही. तुमच्यात दम नाही म्हणून शेजारचा पैलवान बोलावताय! असे बाटगे शिवसेनेने खूप बघितलेत. त्यांना नेस्तनाबूत करण्याची ताकद शिवसैनिकांत आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी  लगावला.

एका मिनिटात हाकलून देईन पण…

प्रताप पाटील चिखलीकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या गद्दारीचा उद्धव ठाकरे यांनी जबरदस्त समाचार घेतला. त्यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारावर कारवाई करणारच, एक मिनिटसुद्धा लागणार नाही. पण शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीवर निवडून आला आहात. लोकांनी मते शिवसेनेच्या नावावर दिली आहेत. त्यामुळे थोडीफार असेल तर राजीनामा द्या आणि मतदारांना सामोरे जा, असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावताच उपस्थित जनसमुदायाने टाळय़ांचा कडकडाट केला. घराणेशाही वगैरे म्हणतात. आहे ना घराणेशाही. म्हणजे घराण्याची परंपरा. हे माझे शिवसैनिक. हाच वारसा घेऊन मी पुढे जात आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोळसा उगाळू नका, वीज द्या!

कोळसा नसल्याचे कारण सांगून राज्यभरात सध्या लोडशेडिंग करण्यात येत आहे. कोळशाची टंचाई भासणार आहे हे सरकारला अगोदर कळाले नाही? सरकारच्या नाकर्तेपणाचा त्रास जनतेने का सोसावा? आणि वर ‘सौभाग्य’ योजना म्हणे. काय तर घराघरात उजेड पाडणार, वीज जोडण्या देणार. तुम्ही वायर जोडाल, पण त्या वायरमध्ये वीज तर पाहिजे. ती कोठून आणणार ते पहिले सांगा, असे आव्हानच यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. निवडणुका अजून लांब आहेत, पण यांना ३५० जागांचे स्वप्न पडले आहे. हे बरोबर कळते पण कोळसा कमी पडणार हे कळत नाही का, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या नाकर्तेपणाची लक्तरे काढली.

देशात दिवाळी की देशाचं दिवाळं?

व्यापाऱयांनी दाखवलेल्या एकजुटीपुढे गुडघे टेकवून सरकारने जीएसटीचा भार कमी केला. आता वर तोंड करून जीएसटीची कर कपात कमी केल्यामुळे देशात दिवाळी आली, असे पंतप्रधान म्हणताहेत. कुठे आहे दिवाळी? कुणाच्या घरात आहे? आत्महत्या केलेल्या पूजाच्या घरात आहे दिवाळी? कर्जमाफी अजून ऑनलाईनच्या चक्रव्यूहात अडकलेली आहे. आहे का शेतकऱयाच्या घरात दिवाळी? देशात दिवाळी आहे का देशाचं दिवाळं वाजलंय? दिवाळी म्हणजे दीपपूजन. लोडशेडिंगमुळे सगळा अंधार आहे, नोटाबंदीने लक्ष्मी ओरबाडून घेतली आहे आणि देशाचे पंतप्रधान दिवाळीच्या बाता मारतात. ही दिवाळी भेट नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. गुजरातची निवडणूक दोन महिन्यांवर आहे. म्हणून पंतप्रधान त्यांच्या शाळेत गेले. तिथली माती कपाळी लावली. तिथे निवडणूक आहे म्हणून खाकऱयावरचा जीएसटी कमी केला, हे आवर्जून सांगितले जाते. हे मुखवटय़ाचे राजकारण शिवसेना करत नाही आणि करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

वार करू तर तोही छाताडावरच…

शिवसेना लपून-छपून काही करत नाही. जे करायचे ते उघड, हीच शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवण आहे, असे भाजपला ठणकावून सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही चोरून पाठिंबा घेता ते चालते. आम्ही उघड सत्तेत सामील झालो  आणि विरोधही उघडपणेच करतो. पाठीत खंजीर खुपसण्याचे धंदे शिवसेना करीत नाही. वार करू तर तोही छाताडावरच!

यांची उपस्थिती

या सभेला शिवसेनानेते पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री अर्जुन खोतकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेत्या आमदार नीलम गोऱहे, उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, उपनेते विनोद घोसाळकर, संयोजक आमदार हेमंत पाटील,  जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, शिवशक्ती-भीमशक्तीचे तानसेन ननावरे, नामदेवराव खोब्रागडे, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संजय जाधव, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संदीपान भुमरे, आमदार संजय सिरसाट, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांच्यासह शिवसेनेचे मराठवाडय़ातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मनपा निवडणुकीतील शिवसेनेचे सर्व उमेदवार, शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या