शिवसेनेची वैयक्तिक हानी, उद्धव ठाकरे यांच्याकडून आदरांजली

826

 ‘‘अरुण जेटली यांचे निधन हा देशाला धक्का आहेच, पण शिवसेनेची वैयक्तिक हानी आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा महत्त्वाचा खांब कोसळला आहे’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

‘‘जेटली यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य होते. सार्वजनिक जीवनात इतका प्रदीर्घ काळ राहूनही त्यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व जपले. ते निष्णात वकील व धुरंधर नेते होते. ‘संकटमोचक’ म्हणून जेटली यांनी मोदी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शिवसेना-भाजपमध्ये नाते टिकावे असे मानणाऱयांपैकी जेटली होते. जेटली यांनी राजकारणात राहूनही नाती व माणसे जपली,’’ असे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘‘राष्ट्रीय राजकारणातून जेटली यांचे जाणे हे राष्ट्रीय राजकारणातून ‘साहसी’ व्यक्तीचे जाणे आहे. आम्ही स्वतः अरुण जेटली यांचे चाहते होतो. त्यांच्या जाण्याने ठाकरे परिवार व शिवसेनेची वैयक्तिक हानी झाली आहे!’’

आपली प्रतिक्रिया द्या