देशात काळ्याचे पांढरे होत असताना आम्ही काळ्याचे भगवे करून दाखवले:उद्धव ठाकरे

1071

सामना ऑनलाईन,कल्याण

नोटाबंदीनंतर सध्या देशात फक्त काळे आणि पांढरे हे दोनच शब्द प्रचलित आहेत. देशात सर्वत्र काळ्याचे पांढरे होत असताना इकडे आम्ही मात्र काळ्याचे भगवे करून दाखवले आहे असा खणखणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लगावला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देशातील पहिल्या भव्य स्मारकाचे दिमाखदार लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. उद्धव ठाकरे यांनी रिमोट कंट्रोलचे बटण दाबताच मखमली भगवा पडदा हळूहळू दूर झाला आणि लाखो, करोडो शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान आणि ऊर्जेचा स्रोत असलेल्या शिवसेनाप्रमुखांचा भव्य 22 फुटी पूर्णाकृती पुतळा तेजाने उजळला.

balasaheb-statue

शिवसेनाप्रमुखांचे दर्शन होताच ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी येथील भगवा तलाव दणाणून गेला.थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुखांचे काही काळ वास्तव्य असलेल्या काळा तलाव परिसरात शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केला. तसा सर्वपक्षीय ठराव करण्यात आला. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत विकासकामांचा धडाका लावून काळ्या तलावाचे रूपडे पालटून तो भगवामय करण्यात आला. ऐतिहासिक कल्याणची अस्मिता असलेल्या या भगवा तलावाच्या काठावर महापालिकेने शिवसेनाप्रमुखांचे भव्य स्मारक साकारले आहे. शिवसेनाप्रमुखांच्या भव्य 22 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि या स्मारकाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

आता शिवसेनाप्रमुखांचे 24 तास लक्ष

यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबाशी कल्याणचा असलेला ऋणानुबंधाचा आवर्जून उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, या तलावाचे सुशोभीकरण करण्याआधी पाहणी करण्यासाठी मी येऊन गेलो होतो, मात्र हा तोच काळा तलाव आहे यावर विश्वास बसत नाही. काळ्या शब्दाला लाज वाटेल अशी पूर्वी परिस्थिती होती. आता विश्वास बसणार नाही इतकं या तलावाचं रूपडं पालटलं आहे. शिवसेनाप्रमुखांचं पहिलं स्मारक त्यांच्या जिव्हाळ्याच्या कल्याण शहरातच झाले याचे मोठे समाधान आहे. शिवसेनाप्रमुखांचे कल्याणच्या विकासाकडे सतत लक्ष होते. आता त्यांचे 24 तास लक्ष राहील असे उद्धव ठाकरे यांनी सांगतले.

कल्याणडोंबिवलीतच नेमकी आचारसंहिता का लागते?

मागेही मी एकदा डोंबिवलीत आलो तेव्हा निवडणुकीची आचारसंहिता होती. आता कल्याणला आलो तर शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागली आहे. कल्याण-डोंबिवलीचे कार्यक्रम म्हटल्यावर आचारसंहिता कशी लागते हे समजत नाही असा मिष्कील सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पुढच्याच क्षणी ते म्हणाले, बाळासाहेब सर्वांच्या मनात आहेत. त्यांना कसली आली आहे आचारसंहिता. केवळ एका कुंचल्याच्या बळावर लोकांच्या मनात स्फूर्ती निर्माण करायची हे जगाच्या इतिहासातील पहिलेच उदाहरण आहे.

आज जर शिवसेनाप्रमुख असते तर त्यांचे आसुड कोणावर उठले असते…

uddhav-thacekray-shivaji-ma

शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्याचे आसुड अनेकांच्या पाठीवर उठलेत. जे पटतं ते पटतं. एका व्यंगचित्र साप्ताहिकातून मराठी माणसाला त्याच्या अस्मितेची, ताकदीची जाणीव करून दिली ती शिवसेनाप्रमुखांनी. आज जर बाळासाहेब असते तर त्यांचे आसुड कोणावर उठले असते हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच प्रचंड हशा, टाळ्या आणि ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला…’ अशा गगनभेदी घोषणा घुमल्या. जेव्हा देशात हिंदुत्व हा शब्द वापरायला घाबरत होते तेव्हा हा शब्द उच्चारून हिंदूंना हिंमत दिली ती शिवसेनाप्रमुखांनी. त्यांनी कधीही शस्त्र्ााचा वापर केला नाही, पण शस्त्रासारखा शिवसैनिक पैदा केला. माझ्या भाषणाची प्रेरणा मी बाळासाहेबांकडूनच घेतली आहे असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

आचारसंहितेच्या काळात स्मारकाचे लोकार्पण होणारा एकमेव नेता

आचारसंहितेच्या काळात कोणतीही उद्घाटने, लोकार्पणे होत नाहीत, पण आचारसंहितेच्या काळात स्मारकाचे लोकार्पण होणारे शिवसेनाप्रमुख हे एकमेव नेते आहेत असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढताच टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. केंद्रातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे लोकार्पण करायचे आहे असे सांगितल्यावर तत्काळ होकार दिला असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

देशविदेशातील मराठी माणसांचा ऊर भरून येईल असा हा आजचा ऐतिहासिक क्षण आहे. शिवसेनाप्रमुखांचे देशातील पाहिले स्मारक उभारण्याचा मान ठाणे जिल्हय़ाला मिळाला ही अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोद्गार ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. अनेक पिढय़ांना हे स्मारक स्फूर्ती, प्रेरणा आणि ऊर्जा देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नंदेश उमपनी पोवाडय़ाद्वारे मनगटे चेतवली

लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरच्या वतीने सादर करण्यात आलेला ‘शिवजागर’ स्फूर्तिदायक ठरला. शिवरायांचे गुणगान गाणारे पोवाडे ऐकून उपस्थितांची मनगटे चेतवली. नंदेश उमप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेली ‘स्वराज्य तोरण चढे… गर्जती तोफांचे चौघडे’, ‘सहय़ाद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा’, ‘माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटीस टिला’, ‘जयोस्तुते…जयोस्तुते’ अशी एकाहून एक स्फूर्तिगीते, पोवाडे अंगावर रोमांच आणणारी ठरली.

कलाकारांच्या मेहनतीचा गौरव

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक आणि भव्य पुतळा साकारण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली अशा सर्व कलाकारांचा गौरव उद्धक ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये वास्तुकिशारद शशी प्रभू, शिल्पकार मंदार दहीबांवकर, संताजी चौगुले, चित्रकार संदीप राऊत, प्रा. नितीन राऊत, संजय सुरे, प्रा. कंजारे, सुहास बहुलकर, उत्तम पाचारने, सुफियान खोंकल, संतोष मसुरकर, मनोहर गावडे तसेच पालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या मेहनतीचे उद्धव ठाकरे यांनी आवर्जून कौतुक केले.

महापौर राजेंद्र देवळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करताना त्यांच्या काळात  शिवसेनाप्रमुखांचे देशातील भव्य स्मारक कल्याणमध्ये उभे राहिले याबद्दल मी भाग्यवान आहे अशी भावना व्यक्त केली.  आयुक्त ई. रवींद्रन यांनी स्मारकाची देखभाल आणि सुशोभीकरणाची जबाबदारी माहापालिका प्रशासन नेटकेपणाने पार पाडेल असे प्रास्ताविकात सांगितले. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी सभागृहनेता सचिन बासरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सौ. रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील,  शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, सुभाष भोईर, शांताराम मोरे, अमित घोडा, डॉ. बालाजी किणीकर, रवींद्र फाटक, नरेंद्र पकार, रूपेश म्हात्रे, सुनील शिंदे, उपमहापौर विक्रम तरे, ठाणे महापौर संजय मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, उपनेते अल्ताफ शेख, महानगरप्रमुख विजय साळवी, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृहनेता राजेश मोरे, गटनेता रमेश जाधव, विरोधी पक्षनेता प्रकाश भोईर, माजी सभागृनेता सचिन बासरे, अंबरनाथ नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, माजी महापौर वैजयंती गुजर-घोलप, दीपेश म्हात्रे, रकी पाटील, कैलाश शिंदे, प्रकाश पेणकर, अभिषेक मोरे यांच्यासह मोठय़ा संख्येने शिकसैनिकांसह ठाणे जिल्हय़ातील जनता उपस्थित होती. यावेळी विविध संघटनांच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. मुस्लिम समाजाच्या वतीने परवेज सय्यद, नगरसेविका शकिला खान यांच्यासह मुस्लिम बांधकांनीही स्वागत केले. यावेळी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या