महादेवपूर ग्रामपंचायतीवर भगवा फडकला

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या महादेवपूर विकास आघाडीने निर्विवाद बहुमत मिळविले, तर सरपंचपदी शिवसेनेच्या विलासराजे सांडखोरे यांची निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेच्या महादेवपूर विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवीत भगवा फडकविला. जनतेने केलेल्या थेट मतदानातून सरपंचपदावर शिवसेनेचे विलासराजे सांडखोरे यांची निवड झाली, तर त्यांचे सहकारी अमोल कडाळे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.

गावच्या विकासाचे संकल्पचित्र वाचून नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. त्यावेळी गावकऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करीत त्यांचा सन्मान केला. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या सबलीकरणासाठी नूतन पदाधिकाऱ्यांनी भक्कम साथ द्यावी, असे मनोगत यावेळी महिलांनी व्यक्त केले. त्याप्रसंगी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.