उद्धव ठाकरे यांची सभा रोखण्यासाठी सीएमचा खोडा; बीकेसी मैदानावर सभा होणारच: शिवसेना

सामना ऑनलाईन । मुंबई

शिवसेनेने युती तोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जोरदार सभा सुरू आहेत, त्याचीच धडकी भरल्याने भाजपकडून कारस्थानं सुरू असल्याची चर्चा आहे. शिवसेनेची बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर सभा होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी कारस्थान रचल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे.

मुंबईत शिवसेनेच्या प्रचार जोरदार सुरू असून सभांना जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभांना प्रचंड गर्दी जमते आणि तितकाच प्रतिसाद देखील मिळतो आहे. अशातच शिवसेनेची एमएमआरडीएची सभा होऊ न देण्याचे कारस्थान मुख्यमंत्र्यांनी रचल्याची टीका अनिल परब यांनी केली.

कोणत्याही सभेसाठी मैदान राखून ठेवायचे असल्यास लँड विभागाला पत्र द्यावे लागते. १८ फेब्रुवारी रोजी शिवसेनेची सभा एमएमआरडीएच्या मैदानावर घेण्यासाठी तसे पत्र शिवसेनेकडून १२ जानेवारी रोजी लँड विभागाकडे देण्यात आले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्याने देखील १८ फेब्रुवारी रोजी अन्य कोणीही बुकिंग केले नसल्याचे सांगितले होते. मात्र आता ते अधिकारी ड्राफ्ट घेऊन, ऑर्डर देण्यास तक्रार नाहीत. कारण सरळ आहे की एमएमआरडीचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट आयुक्तांना भाजपच्यावतीने पत्र दिले आणि ते आधीच्या तारखेने स्वीकारण्यास लावले, असा आरोप परब यांनी केला.

mmrda-shivsena-letter

एमएमआरडीएच्या आयुक्त हे आधी मुख्यमंत्र्यांचे पीए होते. तसेच ते काही काळ नागपूरमध्ये देखील होते. त्यामुळे आयुक्तावर प्रचंड दबाव असल्याचे परब यांनी सांगितले. मुंबईत शिवसेनेच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून महापालिकेची सत्ता आपल्या हातात येणार नाही हे लक्षात आल्याने मुख्यमंत्री रडीचा डाव खेळत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अधिकाऱ्यांकडून आम्हाला जागा बदलून घ्या असं सांगण्यात येत आहे. मात्र अशी सभा रोखून महापालिका मिळवता येईल असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात काम करताय, असं म्हणावं लागेल, असेही परब म्हणाले.

मात्र असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत सभा तिथेच होणार, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच परवानगी न मिळाल्यास निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करू, असेही ते म्हणाले.