बेईमानांनाच वाटतं की लोकं त्यांच्यावर थुंकतात, त्यांची मानसिकता तशीच! – संजय राऊत

“वीर सावरकरांना एकदा न्यायालयात आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा एक बेईमान एका कोपऱ्यात उभा आहे. त्यावेळी सावरकर त्याच्याकडे बघून थुंकले. याची इतिहासात नोंद आहे. बेईमानांवर थुंकणे ही हिंदू संस्कृती आहे. संताप व्यक्त करणं हा एक भाग आहे. मी कोणावरही थुंकलो नाही. सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. देशहित, महाराष्ट्र हित व समाजहिताच्या गोष्टी आम्ही घेतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकतो. मात्र मी थुंकलो नाही, माझ्या दातांमध्ये समस्या आहे, त्यातून व्यक्त झालेली ती कृती आहे. खरंतर त्यांना असं वाटतंय की लोकं त्यांच्यावर थुंकतात. ही त्यांची मानसिकता झाली आहे. त्यांना झोपेत सुद्धा वाटतं की लोकं आम्हाला जोडे मारत आहेत. मात्र लोकं त्यांच्यावर थुंकतात हे खरं आहे.” असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक येथे पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.

ज्याचं जळतं त्यालाच कळतं

यावेळी अजित पवार यांच्या प्रतिक्रियेबद्दल राऊत म्हणाले की, “धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. प्रत्येकाने संयम राखला पाहिजे हे बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आम्ही भोगत आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर उभे आहोत इकडेतिकडे पळालो नाही. आम्ही सगळे आमच्या पक्षासोबत ठामपणे उभे आहोत. आमच्या मनामध्ये पक्ष बदलण्याचा आणि संकटं येतायत म्हणून भाजपसोबत सूत जुळवण्याचा विचार येत नाही.”

“मी थुंकलो म्हणून मी माफी मागू असे त्यांचे म्हणणे असेल तर या देशातील १३० कोटी जनतेला रोज माफी मागावी लागेल कारण लोकं रोज कुठे ना कुठे थुंकत असतात. मी बेईमानांची नावं घेतल्यावर थुंकलो. बेईमानांच नाव समजल्याने माझी जीभ चावली गेली. त्यातून ती प्रतिक्रिया आली. त्यांना जीवशास्त्र, मानसशास्त्र आणि रसायनशात्र काळात नाही. माझ्या इतकं चांगलं संतुलन कोणाचंच नाही, माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलं आहे. हे त्यांनी मान्य करावं. मला अजिबात सुरक्षा नकोय. मी आता जिल्ह्यातील शिवसैनिकांसह त्र्यंबकेश्वरला जातोय. ज्यांनी बेईमानी केली त्यांना सुरक्षा आहे. मी वन मॅन आर्मी असून एकटा लढतो.” असे राऊत म्हणाले.

“माझ्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांकडे का बघायचं? त्यांना ना काम ना धंदा ना त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. लोकांनी त्यांना वर्षभरात खूप जोडे मारलेत. लोकं आता निवडणुकीची वाट पाहत आहेत त्यांना जोडे मारण्यासाठी. त्यांचा टाईमपास चालला असेल तर त्यांना करू द्या, लोकशाही आहे आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र ही भावना शून्य लोकं आहेत. ज्यापद्धतीने यांनी शिवसेनेशी आणि ठाकरे कुटुंबाशी बेईमानी केली, यांना दुसऱ्यांना जोडे मारण्याचा काय अधिकार आहे? यांनी ते जोडे स्वतःलाच मारून घेतले पाहिजे.” जोडे मारावं असं काय केलं आहे? ही बिनडोक लोकं आहेत, ते विषय समजून घेत नाहीत. पण त्यांना आजच्या दिवशी काहीतरी काम मिळालेलं आहे. याचा आनंद आहे. त्यांना चांगली प्रसिद्धी द्या. जास्तीत लोकांना कळू द्या की हे किती बेईमान लोकं आहेत. अशा जोडे मारण्याच्या कार्यक्रमामुळे खऱ्या शिवसेनेवर काहीही परिणाम होत नाही. असे राऊत म्हणाले.

यावेळी रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याबद्दल राऊत म्हणाले की, “काल बेईमान लोकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला गेले होते. ज्यांनी शिवशाहीशी गद्दारी केली. ते लोकं रायगडावर जाऊन शिवशाहीचा सोहळा करत आहेत यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडेंसारखी लोकं तिथे जाऊन शिवाजी महाराजांचा जयजयकार करतात. यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत यांचं पानिपत होणार आहे. काल रायगडावर झालेला कार्यक्रम एका राजकीय पक्षाचा सोहळा म्हणून साजरा झाला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. राज्याभिषेक सोहळा हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नसतो. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. तिथे तुमचाच ढोल वाजवून चालत नाहीत. स्थानिक खासदार सुनील तटकरे यांचा सन्मान राखणार नसाल तर कसं होणार?

पुढे ते म्हणाले की, निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्ष करत असतो. प्रेत्येकाला वाटतं की राज्यात आमच्या लोकसभेच्या ४८ जागा निवडून येतील मात्र असं होत नाही. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय हा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते बसून घेतील.

रेल्वे मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा

ओडिशा येथे बेफिकिरीमुळे रेल्वे अपघात झाला आहे. खरंतर रेल्वे मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला हवा. लालबहादूर शास्त्री, माधवराव महाराज यांनी रेल्वे अपघात झाल्यानंतर राजीनामा दिला होता.

यावेळी ते म्हणाले की भाजपमध्ये महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्यासारखं नेतृत्व झालं नाही आणि होणारही नाही. त्यांची आम्हाला नेहमी आठवण येते.