शिवसेनेने केला महागाईच्या भस्मासूराचा वध

35

सामना प्रतिनिधी । पिंपरी

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईचा पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने शनिवारी वध केला. महागाई कमी करण्याची सदबुद्धी सरकारला देण्याचे देवीला साकडे घातले. पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या या आंदोलनात खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, नगरसेविका मीनल यादव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘अच्छे दिनची लई घाई, कमी झाली नाही महागाई’, ‘महागाई वाढविणा-या भाजप सरकारचा धिक्कार असो, ‘भाजप सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, ‘मोदी सरकार… हाय… हाय… म्हणत सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या.

महागाई गगनाला भिडली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. किती शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली हे सरकार सांगत नाही. देशाचा विकास दर कमी झाला आहे. सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. शिवसेना जनतेसोबत आहे. शिवसेनेला सत्तेची फिकीर नाही. सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके देणा-या सरकारला शिवसेना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार बारणे म्हणाले.

pimpri-sena

तीन वर्षांत सरकार सर्वंच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत भरमसाठ दरवाढ झाली आहे. बाजार मंदावला आहे असे सांगत गौतम चाबुकस्वार म्हणाले.

भाजपने अच्छे दिनाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने भाजपला सत्तेवर बसविले. मात्र तीन वर्षांत भाजपचे खरे रुप उघड झाले आहे. सरकारने महागाई कमी करावी. अन्यथा शिवसेनाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी दिला.

अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणारे भाजप सरकार सर्वसामान्य जनतेची लुट करत आहे. १५ लाख रुपये प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर सरकार टाकणार होते. त्याचे काय झाले? सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात असून सरकारची धिक्कारशाहीकडे वाटचाल सुरू आहे. सरकारच्या विरोधात सोशलमिडीयावर काही लिखाण केल्यावर त्यांना ‘नोटीसा’ पाठविल्या जातात. धमक्या दिल्या जातात, हे निषेधार्ह आहे, असे महिला शहर संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या