
रेल्वे कामगारांच्या पाठीशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे उभा आहे. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नेहमी आपण सदैव कामगारांसोबत असल्याची ग्वाही खासदार, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांनी दिली.
रेल कामगार सेना रनिंग स्टाफ मुंबई यांचे 22 वे वार्षिक अधिवेशन खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आणि संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा उत्साहात पार पडले. भायखळा रेल्वे इन्स्टिटय़ूट येथे पार पडलेल्या या अधिवेशनाला मुंबई विभागातील मोटारमन, लोको पायलट, सहाय्यक लोको पायलटनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. रनिंग विभागातील विशेष कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, निवृत्त मोटारमन, नवनियुक्त लोको इन्स्पेक्टर, महिला लोको पायलट यांचा गौरव करण्यात आला. तसेच रेल कामगार सेनेच्या कार्य अहवालाचे प्रकाशन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर संजय जोशी यांची स्थानीय लोकाधिकार समिती महासंघावर सचिव पदी नियुक्ती झाल्याने आणि सुरेश परदेशी यांची डोंबिवली उपशहर संघटक पदी नेमणूक झाल्याने विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर, अभिजित राणे, संतोष करले, अमौघ निमसुडकर, अभिषेक पांडे, योगेश जाधव, श्रावण कुमार आदी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी तुकाराम कोरडे, प्रशांत कमांकर, संतोष गावडे, नीलेश पाटील, शैलेश प्रधान, देवरुखकर, अनिकेत ढवळे, अभिषेक पांडे आदी उपस्थित होते.