शिवसेनेची वाघीण फुटीरांना भिडली! आशा रसाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदेंसह समर्थकांना कल्याणच्या शाखेत शिरण्यापासून रोखले

कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी मध्यवर्ती शाखेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱया बंडखोरांचा डाव शिवसेनेच्या रणरागिणीने उधळून लावला. या रणरागिणीने खासदार श्रीकांत शिंदेंसह त्यांच्या समर्थकांना शाखेच्या दरवाजाबाहेरच रोखून धरले. आशा रसाळ असे या वाघिणीचे नाव असून शिवसैनिक येईपर्यंत तिने एकटीने हा किल्ला लढवला.

डोंबिवली शहर शाखेचा ताबा घेण्याचा प्रयत्न श्रीकांत शिंदे समर्थकांनी चार दिवसांपूर्वी केला होता, परंतु तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिक व महिला आघाडीने हा प्रयत्न हाणून पाडला. शाखेतील एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांचे पह्टोही हटवले. त्यानंतर आज कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी मध्यवर्ती शिवसेना शाखेचा ताबा घेण्याचा डाव शिंदे यांचा होता. दुपारच्या वेळी शाखा बंद असताना पोलिसांच्या फौजफाटय़ासह श्रीकांत शिंदे व त्यांचे समर्थक शाखेजवळ पोहोचले. ही कुणकुण लागताच शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आशा रसाळ या एकटय़ाच मागचा-पुढचा विचार न करता धावतच शाखेजवळ पोहोचल्या. तोपर्यंत शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी टाळे तोडले, परंतु आशा रसाळ यांनी शाखेचा दरवाजा अडवून धरला. खबरदार… शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असाल तरच आत या. शिंदे समर्थक असाल तर शाखेत पाऊलही ठेवू नका, अशी गर्जना त्यांनी केली.

दरवाजावर आडवे उभे राहून या वाघिणीने आत शिरू पाहणाऱयांना रोखले. शिंदे समर्थकांनी त्यांना धक्काबुक्कीही केली, परंतु तिने त्याची पर्वा केली नाही. श्रीकांत शिंदे यांनी त्यांची समजूत काढत शाखेत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र रसाळ यांनी त्यांनाही दोन्ही खांदे धरून शाखेबाहेरच रोखले. दीड-दोनशे फुटीर आणि सोबतच्या पोलीस बंदोबस्तासमोर आशा रसाळ यांनी एकटय़ाने लढा दिला.

उद्धवजींचा लढा भाजपच्या देशविरोधी कारवायांविरोधात

श्रीकांत शिंदे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र आशा रसाळ यांनी त्यांना खडेबोल सुनावले. हे सगळे भाजपचे षड्यंत्र आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका हा निव्वळ राजकारणाचा भाग नाही, तर तो भाजपच्या देशविरोधी कारवायांच्या आणि सत्तेच्या दुरुपयोगाच्या विरोधात आहे. शिवसेना भाजपच्या घशात जाऊ देणार नाही, असे रसाळ यांनी शिंदे व त्यांच्या समर्थकांना ठणकावून सांगितले. या घटनेनंतर श्रीकांत शिंदेंसह समर्थकांनी काढता पाय घेतला.

भूलथापांना, आमिषांना बळी पडणार नाही

श्रीकांत शिंदे समर्थकांनी शाखेचे टाळे तोडल्याचे समजताच शिवसैनिक मोठय़ा संख्येने शाखेजवळ गोळा झाले. शिंदे समर्थकांनी अर्ध्या तासाचा तमाशा केला असला तरी ही शाखा शिवसेनेच्या ताब्यात असल्याचे संघटक शरद पाटील यांनी सांगितले. शिंदे यांच्या कोणत्याही आमिषांना, भूलथापांना निष्ठावंत शिवसैनिक बळी पडणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.