शेतकऱ्यांनो भिऊ नका शिवसेना तुझ्या पाठीशी आहे !

64

सामना ऑनलाईन, नाशिक

कर्जामुळे खचून गेलेल्या, महागाईचे चटके सोसणाऱ्या, हमीभाव न मिळाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला आता घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कारण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्याला शिवसेना तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस असं म्हणत खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिलंय. नाशिकमध्ये शेतकरी अभियानाची सुरूवात झाली या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी हे अभियान म्हणजे ठिणगी आहे, आणि ठिणगी वणवा पेटवू शकते असं सांगत सरकारला इशारा दिला आहे.

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या अभियानामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या यामध्ये महिलांचाही समावेश होता. या शेतकऱ्यांची व्यथा ऐकल्यानंतर स्वत: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलायला उभे राहीले. ते काय बोलतात हे ऐकण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी आतूर झाले होते. या पुढे देशामध्ये एकतर्फी मन की बात ऐकणार नाही, शेतकऱ्याला पण मन आहे आणि त्याला बोलतं करण्यासाठी आज त्यांना बोलावलंय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांसोबत मनमोकळा संवाद साधला. मुंबई-नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी समृद्धी नको, शेतकऱ्याला उध्वस्त करणारा महामार्ग नको असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं.

या वर्षी तुरीचं बंपर पीक येणार म्हणून सरकारनेच नेमलेल्या एका समितीने अंदाज वर्तवला होता. हे बंपर पीक येणार हे माहिती असूनही डाळ आयात करण्याचा निर्णय कोणी घेतला त्याच्या डोक्याचं मॅपिंग केलं पाहीजे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उलटसुलट निर्णय घेणाऱ्यांची सालटी काढली. पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने सर्व्हे करायाला सुरूवात केली आहे. हा धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले ‘जर तुम्हाला सत्ताच हवी असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आम्ही तुम्हाला बाहेरून विनाशर्त पाठींबा देऊ आणि सरकार अजिबात पडू देणार नाही’. त्याचवेळी सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारणाऱ्या शिवसेनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘विरोधक म्हणत आहेत की शिवसेनेत हिम्मत असेल तर सत्ता सोडावी, अरे सत्तेवर लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही. पण जी लोकं आमच्यावर आरोप करत आहेत की हिम्मत असेल तर सत्ता सोडा, त्यांची दुसऱ्या दिवशी बातमी येते की यांची आणि मुख्यमंत्र्यांची गुफ्तगू झाली, कधी येताय भाजपामध्ये हे असले नालायक लोकं विरोध पक्षात बसले असतील तर तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचे प्रयत्न होतायत, मात्र या बुलेट ट्रेनचा कोणाला फायदा आहे? शेतकरी, महाराष्ट्रातल्या माणसाला याचा काही फायदा आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. सत्तेवर येण्यापूर्वी काळा पैसा हिंदुस्थानात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याच्या आश्वासनाची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले की ‘तुम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करू नका पण त्याच्या खात्यात स्विस बँकेतील १५ लाख रूपये तर टाका’. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत,त्याचा विचारही करू नये,अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांना केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की आता राज्यात शेतकऱ्यांचा मेळावा होईल, तो लाखोंचा मेळावा असेल.एक महिना अभियान झाल्यानंतर विधानभवनावर लाँग मार्च घेऊन जायचं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना  मोठ्या लढाईसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या