हेराफेरी आणि गोलमाल, कीर्तिकरांची साडेसहाशे मतं ढापली शिवसेना न्यायालयात आव्हान देणार

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालात हेराफेरी आणि गोलमाल झाल्याचे अनेक पुरावे समोर आले असून शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यावर बोट ठेवत या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले व ही लढाई शिवसेना कोर्टात लढणार असे जाहीर केले. यावेळी शिवसेना नेते अनिल परब यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. मतमोजणीच्या 19 आणि 23 व्या फेऱ्यांदरम्यान गडबडघोटाळा झाला. याच पाच फेऱ्यांत मतदानाच्या आकडेवारीचे अपडेट्स थांबवले गेले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचा आक्षेपही ऐकून घेतला नाही. मतमोजणी सुरू असताना त्या ‘बाहेर’ जाऊन सतत कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितले ते देण्यासही टाळाटाळ करण्यात आली. आमच्याकडील नोंदीनुसार अमोल कीर्तिकर यांची साडेसहाशे मते ढापली गेली आहेत, असा आरोप परब यांनी केला. त्याचवेळी मूळ तक्रारदार असलेले उमेदवार भरत शहा यांनी, रवींद्र वायकरांची कन्या प्राजक्ता महाले हिने वंदना सूर्यवंशी यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केल्याने हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणीत गडबड करून हा निकाल दिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या देखरेखीखाली उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतांची फेरमतमोजणी घेण्यात यावी, अशी विनंती आम्ही न्यायालयाला करणार असून दोन दिवसांत याचिका दाखल करणार, असे शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी सांगितले.

1 मतमोजणी डाटा अपडेटसाठी ओटीपी येणारा मोबाईल जर दुपारी दोननंतर बाहेर गेला तर त्यानंतरचे राऊंड कुठल्या फोनने अपडेट केले.
2 मतमोजणी दरम्यान निवडणूक अधिकारी कक्षाबाहेर जाऊन मोबाईलवरून सतत कुणाशी बोलत होत्या.
3 संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सीसीटीव्हीमध्ये आली आहे. मग सीसीटीव्ही फुटेज का नाकारले?
4 19 व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीचे निकाल जाहीर केले जात होते. मात्र, त्यानंतर 23 फेरीपर्यंत निकालाची माहिती देणे कशासाठी बंद केले?
5 आयोगाची आकडेवारी आणि कीर्तिकर यांच्या प्रतिनिधींकडील माहिती यात 650 मतांचा फरक निदर्शनास आणूनही दखल का घेतली नाही.
6 पोस्टल मते सुरुवातीलाच मोजून जाहीर केली जातात. मग शेवटच्या फेरीपर्यंत का थांबले?

तक्रारदार भरत शहा म्हणतात, माझ्या कुटुंबियांच्या जिवाला धोका

ईव्हीएमचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने सत्ताधाऱ्यांची देशभर नाचक्की झाली आहे. त्यामुळे ते कोणत्याही थराला जातील. मला व माझ्या कुटुंबियांच्या जिवाला धोका आहे. माझ्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल करून गोवण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा खळबळजनक दावा हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी सोमवारी केला.

– मतमोजणी केंद्रात मोबाईलवरून छुपी सूत्रे हलवली जात होती. त्याबाबत आम्ही तक्रार केली. पण दखल घेतली नाही. मग दहा दिवसांनी तक्रारदार म्हणून तहसीलदारांची एंट्री कशी झाली?
– तक्रारदार म्हणून आमच्या नावाने एफआयआर का नोंदवला नाही. आम्हाला साक्षीदार का बनवले? हा संपूर्ण गडबडघोटाळा केस ढिली करण्याचीच तयारी आहे.
– पोलिसांत तक्रार द्यायला गेलो, त्या वेळी वायकर यांच्या मेहुण्यासह त्यांची मुलगी प्राजक्ता महाले हिचेही नाव सांगितले होते. पोलिसांनी आरोपी म्हणून तिचे नाव का टाळले?
– जप्त मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे. ही लॅब विकली गेली नसेल तर सत्य समोर येईल.
– निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी कोर्टाचा आदेश आणा, मगच सीसीटीव्ही फुटेज देऊ, असे जाहीर केले. ही निव्वळ हुकूमशाही आहे.
– पोलीस प्रकरण दडपत आहेत. आम्ही 7 ते 12 जूनचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे.

लढणार आणि जिंकणारच

अमोल कीर्तीकर हे 4 जूनलाच खरे तर जिंकले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत मतमोजणी केंद्रावर जो घोळ सुरू होता त्यानंतर 48 मतांनी ते हरले, असे समोर आले. निकालासंदर्भात जी गडबड करण्यात आली त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. ही लढाई आम्ही लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. इलेक्शन कमिशन म्हणजे एंटरायली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन आहे. एका पक्षाच्या सांगण्यावरून ते काम करत आहेत. सगळी गडबड करूनही इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले. गडबड झाली नसती तर सरकार बदलले असते. कदाचित देशात अनेक ठिकाणी असे झाले असेल, असा आरोप त्यांनी केला.