शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आता कधीही निवडणुका होऊ द्या, आम्ही तयार आहोत, असा विश्वासही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या विलंबाबतही भाजपवर हल्ला चढवला.
आता सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोग चालवतो. आता सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोगाला कार्यक्रम देतो. आता सत्ताधापी पक्षच निवडणुकांबाबतचे निर्णय घेतो, असे चित्र आहे. राज्याच्या निवडणूका हरयाणा आणि जम्मू कश्मीरसोबत होणे अपेक्ष्त होते. मात्र, सत्ताधारी पक्षाला ते सोयीचे नसल्याने तसेच हरियाणा, जम्मूकश्मीरसोबत प्रचाराला पंतप्रधानांना वेळ देता येणे शक्य नसल्याने राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असाव्यात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ असतो, तेव्हा ते परदेशात असतात आणि ते परदेशात नसतात, त्यावेळी ते कोणत्याकरी प्रचारात गुंतलेले असतात, आपल्या पंतप्रधानांना ही दोनच कामे असल्याचे दिसते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. येत्या तीनचार दिवसात आचारसंहिता लागेल, असे सत्ताधारी पक्ष सांगत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. निवडणुका कधीही होऊ दे, आमची तयारी पूर्ण झाली आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फक्त त्यांनी ईव्हीएम कोणत्या गोडाऊनमध्ये दडवून ठेवले आहेत आणि बंद दाराआड त्यात काय घातले जातेय, यावर आम्हाला लक्ष ठेवावे लागेल. हरयाणातील निवडणूक निकालांबाबतही त्यांनी ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.