बीकेसीतील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. सिग्नल तोडणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे आणि अनधिकृत पार्किंग अशा बेशिस्त वाहतुकीमुळे वाहनचालकांना, पादचाऱ्यांना त्रास होत आहे. पहिल्यांदा बीकेसीतील बेशिस्त वाहतुकीला आवर घाला. बीकेसीतील वाहतुकीच्या गोंधळाबद्दल शिष्टमंडळाने मांडलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत एकदाही झालेला नाही. मात्र वाहतुकीचा अभ्यास न करता आता अचानक मनमानी पद्धतीने बीकेसीतील रोड रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र कोणताही चुकीचा निर्णय घेण्याआधी वाहतूककोंडीसंदर्भात नीट अभ्यास करा आणि नंतरच निर्णय घ्या, असा टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई उपनगराच्या पालकमंत्र्यांना लगावला.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंत्री असताना आदित्य ठाकरे सायकलप्रेमींसाठी सुरक्षित जागा असावी यासाठी बीकेसीमध्ये सायकल ट्रकची निर्मिती केली होती, मात्र हा सायकल ट्रक वाहतुकीच्या मुख्य रस्त्याला जोडण्यात येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी आज सांगितले. यामुळे मूळ समस्या न सोडवता दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्र्यांवर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
या उपाययोजना करा
बीकेसीतील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवा वाहतूक पॅटर्न लागू करा. वाहतुकीचा अभ्यास करून बेस्ट बसचा वापर वाढवा, बस थांबे वाढवा. मुख्य म्हणजे बीकेसीत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचे बॅरिकेड्स अस्ताव्यस्तपणे कसेही उभे केले आहेत. त्यामुळे बीकेसीतील वाहतूककोंडीत आणि बेशिस्तीत वाढ झाली आहे. हे बॅरिकेड्स तिथून तत्काळ हटवा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.