
गडहिंग्लज नगरपालिकेने काढलेली दोन कोटी 35 लाखांची काढलेली टेंडर प्रक्रिया संशयास्पद असून, या कामांची फेरनिविदा काढण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज नगरपालिकेने दोन कोटी 35 लाखांचे टेंडर परस्पर काढले आहे. यामध्ये स्टेशनरी पुरविणे, छपाई, स्मृतिचिन्ह, बॅनर यासाठी सात लाख 35 हजार, भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी पाच लाख, बांधकाम खात्याकडे सुपरवायझर नेमण्यासाठी सहा लाख, जलतरण तलाव चालविणे व देखभालीसाठी सहा लाख, कर विभागाकडे सेवा पद्धतीने तीन कुशल मदतनीस पुरविण्यासाठी सहा लाख, संगणक परिचालक पुरविण्यासाठी 10 लाख, उद्यानातील झाडांची देखभाल व इतर कामे करण्यासाठी 22 लाख, पाणीपुरवठा विभागासाठी विविध ठिकाणी काम करण्यासाठी 60 लाख, तर साहित्यखरेदीसाठी 15 लाख, पालिकेच्या विविध वाहनांवर व फायरमन पुरवठा करण्यासाठी 20 लाख, शहरात रस्त्याकडेला लावलेल्या झाडांची देखभाल व आनुषंगिक कामे करण्यासाठी 20 लाख असे एकूण दोन कोटी 35 लाखांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये मुख्यत्वे विविध विभागांसाठी मनुष्यबळ पुरविणे हा हेतू असल्याने सदरचे टेंडर परस्पर काढण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई करावी आणि या कामांची फेरनिविदा काढण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.