खोके सरकार महाराष्ट्रासाठी पनवती, शेतकरी व तरुणांच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंनी मिंधे सरकारवर डागली तोफ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज बुलढाण्यात धडाडली. चिखली इथे झालेल्या शेतकऱ्यांच्या अतिविराट मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवरून मिंधे सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, ओला दुष्काळ, राज्याबाहेर जाणारे उद्योग आणि छत्रपतींचा वारंवार होणार अपमान या मुद्द्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसल्यापासून पनवती सुरू झाली आहे. हजारांच्या आसपास शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. मग गुवाहाटीला जाऊन कसला नवस तुम्ही फेडताय? जिथे शेतकरी आत्महत्या करतोय, ओला दुष्काळ पडलाय तिथे कृषीमंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करायची गरज नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्यसरकारवर आसूड ओढले.

मी संभाजीनगरचा दौरा केला तेव्हा शेतकरी गुडघाभर पाण्यात उभा होता. शेतकऱ्याला खायचे काय हा प्रश्न पडलेला. जो शेतकरी राबराब राबतो, सोनं पिकवतो त्या शेतकऱ्याला प्रश्न पडतो खायचं काय. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणाले की मी रोज 2-3 किलो शिव्या खातो. शिव्या खाऊन तुमचे पोट भरत असेल, पण माझ्या शेतकऱ्याचे पोट कसे भरणार ते सांगा, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

संपूर्ण भाषण ऐका

देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओही ऐकवला. यात ते मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे हजारो कोटींचे वीज बिल भरल्याचे म्हणत आहेत. याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. वरती बसल्यावर वेगळी भाषा आणि खाली उतरल्यावर वेगळी भाषा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्याचे आव्हान दिले.

उठ म्हटले की उठायचे, बस म्हटले की बसायचं

ठीक आहे काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. हे रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे 40 रेडे तिकडे गेल्याचे म्हटले. हे आज तिकडेनवस फेडायला गेलेत. गेल्या आठवड्यात गेले होते स्वत:चा हात दाखवायला. म्हणजे ज्याला स्वत:चे भविष्य माहिती नाही तो आपले भविष्य ठरवणार. तुमच्या हात की सफाई संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे आणि तुमचे भविष्य जे आहे ते कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोगी नाही, तर तुमचे भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले तुमचे मायबाप. त्यांनी उठ म्हटले की उठायचे, बस म्हटले की बसायचं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

– मी बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीय. जुने होते ते फसवे होते. गद्दार निघाले. त्यांनी असे वाटले की त्यांची मालमत्ता आहे. हे जे मर्द मावळे इकडे जमलेले आहेत. तुमचा उत्साहाकडे पाहिल्यानंतर असेच वाटते की या धगधगत्या मशाली अन्याय जाळायला निघाल्या आहेत.

– आपले सरकार व्यवस्थित चालले होते, पण हे सरकार पाडले गेले. बर यांची पाडायची पद्धत कशी आहे. मला मघाशी नितीन देशमुख येऊन भेटले. नितीन देशमुख रांगडा, तगडा, हिंमतवाला माणूस आहे. त्यांनासुद्धा घेऊन गेले होते गुवाहाटीला, पण त्यांनी सांगितले तुम्ही मला कापले तरी तुमच्यासोबत येणार नाही. शिवसेनेत आहे आणि शिवसेनेतच राहणार. नितीन देशमुख परत आले, आणि आज तिकडे गेले ते काय झाडी, काय डोंगर सगळे ओके.

– हा शेतकरी मेळावा आहे. मी मनापासून सांगतो की त्यांना तिथे आशीर्वाद घ्यायला जायची गरज लागली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. मी या जिजाऊंच्या जन्मस्थानी माझ्या माता भगिनींचे, शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी जो पुन्हा नव्या दमाने आणि त्वेशाने उभा आहे, पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच. हा माझा आत्मविश्वास तुम्ही आहात.

– नितीन देशमुख, कैलास पाटील, विनायक राऊत, अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत. पण यांना कसे नेले. आपल्या पलीकडच्या ताई तुम्हाला माहिती आहेत. आपल्या ताई आहेत. आपणच त्यांना दोनदा, चारदा खासदार केले. इथल्या सुद्धा गद्दारांना आमदारांना, खासदारांना तुम्हीच निवडून दिले. पण या ताईंना धमक्या देण्यात आल्या, खास मुंबईहून दलाल इकडे पाठवायले जायचे. त्यांच्यावरील सर्व आरोप वाचले गेले, त्यांचे आजुबाजेचे चेले-चपाटे यांना अटक झाले. ताई हुशार, त्यांनी जाऊन थेट पंतप्रधानांना राखी बांधली. आता तो फोटो छापून आणला. त्यानंतर ईडीवाल्यांची हिंमत आहे का.

– आपण 25-30 वर्ष भाजपसोबत होतो. पण आज तो भाजप आयात पक्ष झाला आहे. विचार संपले, नेते संपले, भाकड पक्ष झालेला आहे. कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत यादी काढा की यांच्या पक्षात बाहेरच्या पक्षातून आयात केलेले नेते किती आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची चाललेली दादागिरी, हुकुमशाही आपल्या मर्द मावळ्यांना मोडता येणार नाही. अरे हा पक्ष आहे की चोरबाजार आहे. स्वत:कडे काहीच शिल्लक राहीले नाही मग बाहेरून चोरून नेते घ्यायचे आणि आपल्यासमोर करायचे.

– तुमच्या साक्षीने 40 रेडे किंवा गद्दार यांना प्रश्न विचारतो. या इथले गद्दारांमध्ये त्यांच्यात अजुनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीर सांगावे की आम्ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही. यांना नाव बाळासाहेबांचे पाहिजे, चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे, शिवसेनेचे नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे. मग तुमची मेहनत कुठे.

– छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. आपल्या छत्रपतींचा वारंवार अपमान केला जातोय. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळवले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई बोंबलले. त्यांनी आपल्या सोलापूरवर, अक्कलकोटवर हक्का सांगितला आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकच्या निवडणुका आहेत, मग हे आपले पंतप्रधान गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेते, तसेच महाराष्ट्राचे तुकडे करायला मागेपुढे बघणार नाही. आपले मिंधे मुख्यमंत्री शेपूट आत घालून सांगतील जाऊद्या ना 40 गावं द्यायचे देऊन टाकू, पंतप्रधान बोलले की पीओके घेतल्यानंतर 100 गावं महाराष्ट्राला देतो.

– इथले उद्योगधंदे तिकडे न्यायचे, महाराष्ट्र कंगाल करायचा, महाराष्ट्रातील बेकारी वाढेल. छत्रपतीचा अपमान करून आपले आदर्श संपवून टाकायचे. आपली गावे तोडून त्यांच्या घशात घालून महाराष्ट्र तोडून टाकायचा. सोलापूरवर कर्नाटक हक्क जो सांगतोय, सोलापूर तिकडे गेल्यावर पंढरपूरचा विठोबाही तिकडे जाणार. पंढरपूरचा विठोबा तिकडे गेला आहे मग जी शतकानुशतके चालत आलेली वारीची परंपरा आहे हे विठोबाच्या दर्शनासाठी कर्नाटकचा टोल भरून कर्नाटकात जाणार. माझ्या महाराष्ट्रातील दैवत सुद्धा तुम्ही पळवणार. अक्कलकोटचे आमचे स्वामी समर्थ तुम्ही पळवणार. आम्ही काय षंढासारखे बघत बसणार.

– ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला गेला, सावरकरांचा अपमान केल्यानंतर आम्ही सुद्धा बोललो. आम्ही नाही सहन करणार. हे सर्व आम्ही त्वेशाने बोललो, पण हे मिंधे सरकार राज्यपालांची बॅग पॅक करून पाठवून देण्याची हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती.

– मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा आगाऊपणा सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून आदर बाळगतो, पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेले आहे त्याचा मान राखू शकत नाही, अजिबात नाही. जर तुम्ही आमच्या महाराजांचा अपमान करणार असाल तर तुमचे वय किती असेल, तुम्ही तुमच्या घरात बसा, पण आमच्या दैवताबाबत जुने आदर्श कसे बोलू शकता.

– महाराष्ट्राचे उद्योग बाहेर जाताहेत तरी तुम्ही शेपट्या घालून बसला आहात, महाराष्ट्र तोडण्याची भाषा होतेय तरी तुम्ही शेपट्या घालून बसला, महिलेचा अपमान होतो तरी तुम्ही शेपट्या घालून बसताय, हे बाळासाहेबांचे हिंदुत्व नाहीय, हे बाळासाहेबाचे विचार नाही.

– शहीद दिन असताना हे नवस फेडायला गेले. स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास नाही, शेतकऱ्यांकडे बघायला वेळ नाही. स्वत:चे भविष्य बघायला ज्योतिषाकडे जाता तुमचे आलेले नवसाचे बाळ सरकार टिकावे म्हणून गुवाहाटीला जाता. मग हा जो अतिवृष्टीने पिचलेला शेतकरी मदतीसाठी टाहो फोडतोय तो दिसत नाही.