भुदरगडमध्ये शिवेसेनेची लाट; 21 गावात निर्विवाद विजय

भुदरगड तालुक्यात झालेल्या 45 ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, स्थानीक आघाड्यांनी मजल मारली आहे. या निवडणुकीत शिवसेना 21, राष्ट्रवादी 14 तर उर्वरीत स्थानिक आघाड्यांनी 10 ठिकाणी यश मिळविले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने सत्ता काबीज केली.

खानापूर येथे शिवसेनेचे बी. डी. भोपळे, राजु पाटील, मानसिंग दबडे यांच्या आघाडीने 6 जागा जिंकून भाजपप्रणित आघाडीचा धुव्वा उडविला. म्हसवेत तिरंगी लढत झाली असून बिद्रीचे संचालक मधुकर देसाई यांच्या आघाडीने 7 जागा जिंकून विरोधी आघाडीचा दारूण पराभव केला. आदमापूर येथे तिरंगी लढतीत बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व विजयराव गुरव यांच्या आघाडीने गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे व बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील यांच्या आघाडीवर मात करून सत्ता प्रस्थापित केली.

गंगापूर येथे हुतात्मा सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, प्रकाश कुलकर्णी, एन. वाय. पाटील यांच्या आघाडीने 7 जागा जिंकून सत्ता कायम राखली. तर विरोधी आघाडीचे तानाजी जाधव व अजित जाधव यांना 2 जागेवर समाधान मानावे लागले. उपसभापती सुनिल निंबाळकर यांना फणसवाडी गावात सत्ता गमवावी लागली. येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळ जाधव यांनी सत्ता काबीज केली आहे.

मिणचे खुर्द येथे भाजपचे प्रविण नलवडे यांच्या आघाडीला दणका बसला असून आर. व्ही. देसाई यांच्या आघाडीची सत्ता आली आहे. बसरेवाडीत शिवसेनेचे कल्याणराव निकम यांच्या आघाडीने सत्ता कायम राखत विरोधी आघाडीचा दारूण पराभव केला. बिद्रीचे संचालक प्रदीप पाटील व संजय मालंडकर यांच्या आघाडीने मोरेवाडीत सत्ता कायम राखली. नाधवडे येथे श्रीमती गिता संभाजीराव पाटील, आबासाहेब भोसले यांच्या आघाडीने 6 जागा जिंकून सत्ता काबीज केली.

शिवसेनेने पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर तसेच कडगाव जिल्हा परिषदेत बिद्रीचे माजी संचालक के. जी. नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केले आहे. या निवडणूकीत बहुतांशी ठिकाणी स्थानीक आघाड्या झाल्या होत्या. शिवसेनेचे धनाजी खोत यांनी 21 गावात निर्विवाद सत्ता प्रस्थापीत केली आहे. तर के. डी. सी. सी. चे संचालक रणजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीने 26 गावात आणि काँग्रेसचे सचीनदादा घोरपडे यांनी 15 गावात सत्तेत आल्याचा दावा केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गावात शिवसेनेची बाजी
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या गावात शिवसेनेने सत्ता काबीज करून राज्याचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खानापूरातील विजयानंतर आमदार आबिटकर यांचे सोशल मिडियाद्वारे अभिनंदन केले आहे.

पाच जणांना दिली चिठ्ठीने साथ
सालपेवाडी येथे दत्तात्रय गोरे, नागणवाडीत सिंधुताई साळवी, तांब्याचीवाडीत प्रकाश परब, मठगाव-मानीत अमोल मेंगाणे तर बेगवडेतील स्वप्नील चव्हाण यांना समान मते मिळाली. यामुळे त्यांची चिठ्ठीवर निवड झाली.

आपली प्रतिक्रिया द्या