मुंबईत शिवसेनेचा विजयी जल्लोष!

मुंबईमुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून शिवसेना सलग पाचव्यांदानंबर वनचा पक्ष ठरल्यानंतर आज महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची बहुमताने निवड झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका परिसरात अक्षरशः भगवा जल्लोष झाला. ठिकठिकाणी फडकणारे भगवे झेंडे, भगव्या पताका, भगवे कंदील, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, भगवे फेटेधारी, भगव्या साडय़ा नेसून उत्साहात सहभागी झालेल्या हजारो महिला यामुळे भगवी दिवाळीच साजरी झाली.

शिवसेना केवळ घोषणा करत नाही तर सार्थ करून दाखवते – उद्धव ठाकरे

‘माझ्या शिवसैनिकांनी आणि मुंबईकरांनी अहोरात्र कष्ट घेऊन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवून दाखवला. कुठल्याही आमिषाला बळी न पडता आणि विरोधी शक्तींशी त्वेषाने लढत शिवसैनिकांनी विजयश्री खेचून आणली त्या माझ्या शिवसैनिक आणि मुंबईकरांचे शतशः आभार’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने सकाळपासून प्रचंड गर्दीने जमलेल्या शिवसैनिकांमध्ये एकच नवचैतन्य संचारले.

महापालिका इमारतीसमोर बांधलेल्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. मराठी माणसाच्या आणि शिवसेनेच्या मनगटात किती जोर आहे, हे तुम्ही दाखवून दिल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोरदार घोषणाबाजीने आसमंत दुमदुमून गेला. ‘शिवसेना केवळ घोषणा देत नाही, तर त्या सार्थ करून दाखवते’ असे खणखणीत प्रतिपादन केले. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या जबरदस्त वक्तव्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.

शिवसेनेवरील निष्ठा अशीच कायम ठेवा!

सलग पाचव्यांदा मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात सत्ता दिली. हे देशातच नव्हे तर जगात क्वचितच एखादे उदाहरण असेल. शिवसेनेवरील तुमची ही निष्ठा अशीच कायम ठेवा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

untitled-1