’परळी विधानसभा निवडणूक शिवसेना लढणार’

69

सामना प्रतिनिधी । परळी

परळी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मातोश्रीवरुन हाच संदेश घेऊन मी आलो असल्याची घोषणा शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी केली. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर मागील निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता.

शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिव संपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना साबणे यांनी ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून परळी विधानसभा शिवसेना लढणार असल्याचा संदेश मातोश्रीहून घेवून आलो आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरोधकांना हाबाडा देणार असा विश्वास जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी व्यक्त केला.

शिवसंपर्क मोहिमेसाठी परळी शहरातील भागवत पॅलेस मिटींग हॉल येथे घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना येणाNया निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जाणार या ध्येय धोरणाविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हा संघटक रत्नमाला मुंडे, उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, नगरसेविका गंगासागरताई शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती. तर तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके, शहर प्रमुख राजेश विभूते, तालुका युवा अधिकारी व्यंकटेश शिंदे, माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या