बेरोजगारांना न्याय, मच्छीमारांच्या पुर्नवसनासाठी शिवसेना जेएनपीटीवर धडकणार

57

सामना प्रतिनिधी । न्हावा-शेवा

नवी मुंबई, उरणमधील अनेक प्रकल्पांसाठी कवडीमोल भावाने जमिनी घेऊनही भूमिपुत्रांवर अन्यायाचा वरवंटा फिरवणाऱ्या जेएनपीटीला धडा शिकविण्यासाठी २३ फेब्रुवारी रोजी शिवसेना जोरदार आंदोलन करणार आहे. शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: या मोर्चाचे नेतृत्व करणार असून हजारो प्रकल्पग्रस्त या मोर्चात सहभागी होणार आहेत. प्रकल्पग्रस्त असलेल्या १८ गावांतील तसेच उरण तालुक्यातील बेरोजगारांना नोकरीत सामावून घ्यावे, चौथ्या बंदरामुळे उद्ध्वस्त झालेल्या मच्छीमारांचे तत्काळ पुनर्वसन करावे आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबई शहर वसविण्यासाठी तसेच या पट्ट्यातील मोठमोठे कारखाने व अन्य प्रकल्पांसाठी भूमिपुत्रांनी आपल्या पिकत्या जमिनी दिल्या. मात्र साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न असो वा नोकऱ्यांचा सरकारने नेहमीच प्रकल्पग्रस्तांची आश्वासनांवर बोळवण केली. जेएनपीटी या आंतरराष्ट्रीय बंदरात आता नवे मोठे चौथे बंदर उभे राहिले असून येथे नोकऱ्या व रोजगाराची मोठी संधी आहे. असे असताना कंपनीचे ठेकेदार स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना कामावर घेत आहेत. ५५ प्रकल्पग्रस्त सोडले तर अन्य भूमिपुत्रांना वाऱ्यावरच सोडले आहे. याबाबच जेएनपीटी व बीएनसीटीला अनेकदा जाब विचारूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या अन्यायाविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असून प्रशासनाला सळो की पळो करणार आहेत. हा मोर्चा २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता निघणार आहे.

यापुढे सहन करणार नाही.. धडा शिकवू..
शिवसेनेच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला चांगलीच धार आली आहे. शुक्रवारचे आंदोलन प्रशासनाला त्यांची जागा दाखविणारेच ठरणार असून यापुढे भूमिपुत्रांवरील अन्याय सहन करणार नाही.. धडा शिकवूच.. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांनी दिला. या मोर्चात स्वत: उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, आमदार भरत गोगावले, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या