पालघरमध्ये २६पैकी १८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

47

सामना प्रतिनिधी । पालघर

पालघर जिह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले. शिवसेनेने २६पैकी तब्बल १८ ग्रामपंचायतींवर भगवा झेंडा डौलाने फडकवला. बहुजन विकास आघाडीला धोबीपछाड देत त्यांच्या ताब्यातील केळवे व उमरोळीसह १७ ग्रामपंचायती शिवसेनेने ताब्यात घेतल्या. भाजपकडे फक्त एकच पंचायत आली. या विजयानंतर शिवसैनिकांनी जिह्यात ठिकठिकाणी जल्लोष केला.

जिह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. सकाळी १० वाजता येथील आर्यन हायस्कूलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. निकालानंतर शिवसेनेची विजयाची घोडदौड सुरू झाली. २६ पैकी तब्बल १८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवत शिवसेनेने विरोधकांना चीत केले. नगावे ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले असून तिघरे ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडी तर एडवन, माकुनसार, खारेकुरण, भादवे, वाकसई या ग्रामपंचायती बहुजन विकास आघाडीने जिंकल्या. मथाणे येथे सर्वपक्षीयांच्या विकास आघाडीने विजय मिळवला आहे. यापूर्वी फक्त कोळगाव या एकाच ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता होती.

या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा
केळवे, उमरोळी, पंचाळी, आळेवाडी, मुरबे, कांद्रे, भुरे, मांडे, दातिवरे, वेढी, नांदगाव, कुंभवली, दापोली, कोलवडे, मोरेकुरण, दांडे, वीराथनबुद्रुक, कोळगाव.

शिवसैनिकांच्या मेहनतीचे फळ
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन तसेच शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीमुळेच पालघर जिह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. ही विजयाची पताका यापुढेही अशीच डौलाने फडकत राहील, असा विश्वास ग्रामीण जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी व्यक्त केला.

शहापूरमधील चारपैकी तीन ग्रामपंचायती शिवसेनेकडे
शहापूर – ठाणे जिह्यातील शहापूर तालुक्यातील चार पैकी तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कळभोंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर अंबरजे व आपटे ग्रामपंचायतीवरही शिवसेनेने विजय मिळवला आहे. भातेसई ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वपक्षीय बिनविरोध झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कानडी ग्रुपपंचायतच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारली. भाजप खासदार कपील पाटील ही निवडणूक प्रतिष्ठsची केली होती. मात्र शिवसेनेचीच सरशी झाली असल्याचे शिवसेनेचे शहापूर तालुका प्रमुख मारुती धिरडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या