मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

18


सामना प्रतिनिधी, पेण

मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी पडलेले खड्ड्यांविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून महामार्गावरील खड्डे येत्या 10 दिवसात न भरल्यास रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या कल्पना पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रांताधीकारी पेण व पेण पोलीसांना दिला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, अवघड वाहतूक सेनेचे अच्युत पाटील, अशोक वर्तक, संजय पाटील, प्रशांत पाटील, दर्शन वाडकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रत्यक्ष महामार्गावर पहाणी केली व आंदोलनाचा इशारा दिला.

तरणखोप ते वडखळ या दरम्यान महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात घडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक निरपराध प्रवाशांना जिव गमवावा लागला आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम मागिल अनेक वर्षापासून सुरू असून या कामाचे नियोजन बरोबर नसल्याने महामार्गावर अनेक ठिकाणी भरावासाठी टाकलेली माती पावसामुळे रस्त्यावर आल्याने चिकट झालेल्या रस्त्यावर दुचाकी चालकांच्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ठेकेदाराने लवकरात लवकर या मार्गावरील अडचणी दूर कराव्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कल्पना पाटील यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या