नांदगावमध्ये दहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

सामना प्रतिनिधी । नांदगाव

नांदगाव तालुक्यात पंधरापैकी दहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. नागापूर ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवीत शिवसेनेने माजी आमदार संजय पवार यांना जोरदार धक्का दिला आहे.

नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे आणि बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना करण्यात आली. पंधरा ग्रामपंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. नागापूर, मूळडोंगरी, बोयगाव, भार्डी, नवसारी, धनेर, तळवाडे, शास्त्रीनगर, हिरेनगर, कसाबखेडा या दहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला.

नागापूरच्या सरपंचपदी ताराबाई पवार या विजयी झाल्या, त्यांनी माजी आमदार संजय पवार यांच्या कुटुंबातील शशीकला राजेंद्र पवार यांचा २१६ मतांनी पराभव केला. बोयगाव येथे अश्विनी नाईकवाडे सरपंच झाल्या, त्यांनी जिजाबाई शेरमाळे यांचा पराभव केला. कसाबखेडाच्या सरपंचपदी विजयी झालेले तुळशीराम चव्हाण यांनी कांतीलाल चव्हाण यांचा दहा मतांनी पराभव केला. भार्डी येथे अनिता मार्कंड यांचा पराभव करीत मनीषा मार्कंड सरपंच झाल्या. हिरेनगरच्या सरपंचपदी वामन पवार हे विजयी झाले, त्यांनी देवीदास सोनवणे यांचा पराभव केला.