वाई बाजार पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत फडकला भगवा

सामना प्रतिनिधी, माहुर

माहुर तालुक्यातील वाई बाजार पंचायत समितीच्या गणाच्या पोट निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार नामदेव कातले हे 1103 मतांनी विजयी झाल्याने या गणावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. नामदेव कातले यांना 5677 तर राष्ट्रवादीचे आयात उमेदवार गणपत मडावी यांना 4574 मते प्राप्त झाली.

येणार येणार म्हणून चर्चा असलेल्या वाईबाजार पंचायत समितीच्या गणाची पोट निवडणुकीत अखेर शिवसेनेचे उमेदवार नामदेव कातले हे 1103 मताधिक्य घेऊन एकूण 5 हजार 677 मते मिळवून निवडून आले आहेत विशेष उल्लेखनीय बाब अशी की सदरील पोट निवडणूक राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक व काँग्रेसचे केशवे कुटुंबीय यांनी प्रतिष्ठान पणाला लावून जंग जंग पछाडून सुद्धा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे याच्या नेतृत्वात भाजपच्या मदतीने त्यांचा दारुण पराभव केला असल्याचे वाई बाजार गणाच्या पोट निवडणुकीवरून दिसून आले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या आघाडाला पिछाडी लागली असून त्याचाच परिणाम म्हणून किनवट माहूर मतदार संघात शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना 94 हजार मते घेऊन 44 हजाराची मताधिक्य मिळवले होते. ते मताधिक्य स्थानिक सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याने त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याने काँग्रेसचे गणपत मडावी यांना आयात करून घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविली होती. एकीकडे पंधरा वर्षापासून अविरतपणे सताधारी आमदार प्रदीप नाईक व काँग्रेसचे केशवे कुटुंबीय तसेच किनवट वरील बलाढ्य नेतेमंडळी सोबतीला असताना देखील शिवसेनेचे उपजिल्हप्रमुख ज्योतिबा खराटे, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांच्यासह भाजपचे अ‍ॅड. रमण जायभाये, युवा नेते सुमित राठोड यांनी प्रचंड धनशक्ती समोर निर्धन जनशक्ती उभी करून राष्ट्रवादी व काँग्रेसला दुसरा जबर धक्का दिला आहे.

त्यामुळेच शिवसेना-भाजप कार्यकर्ते यांनी प्रचंड जाहीर मिरवणूक काढून फटाक्याच्या अतिषबाजीसह ”वाई बाजार पंचायत समिती झाकी है, किनवट – माहूर विधानसभा बाकी है”च्या गजरात विजय उत्सव साजरा केला आहे. तर काँग्रेस पक्षाचे अनंराव केशवे, प्रा.राजेंद्र केशवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून मतदार संघात रात्रंदिवस एक करून पूर्ण राजकीय ताकद पणाला लावून सुद्धा मतदारानी त्यांच्या पदरी निराशा टाकून शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नामदेव कातले यांना 1103 येवढे मताधिक्य देऊन निवडून आणले. पंचायत समितीच्या अभुतपूर्व निकालाचे स्वागत, नव्या पर्वाची नांदी या उमेदवार यांना मताधिक्य दिल्याने तुर्तास तरी माहुर तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहे.