पालिकेच्या वैधानिक समित्यांवर शिवसेनेचा भगवा

31

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव आणि शिक्षण समिती अध्यक्षपदी मंगेश सातमकर यांची बिनविरोध निवड झाली. दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल झाला नसल्यामुळे पीठासीन अधिकारी महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी दोन्ही अध्यक्षपदी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. या निवडींमुळे पालिकेच्या दोन्ही महत्त्वपूर्ण वैधानिक समित्यांवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झालेले यशवंत जाधव हे मार्च १९९७ मध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. यानंतर २००० ते २००१ या कालावधीत स्थापत्य समिती अध्यक्षपद भूषवले आहे. २००७ मध्ये ते पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांची उद्यान आणि बाजार समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यानंतर २०१७ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर पालिका सभागृह नेतेपदाची जबाबदारी सोपवली होती. आपल्या कारकीर्दीत त्यांनी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडताना आपल्या कार्याचा ठसाही उमटवला.

मंगेश सातमकर चौथ्यांदा शिक्षण समिती अध्यक्षपदी

पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी चौथ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. सातमकर हे १९९४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.  त्यानंतर २००२ ते २०१२ पर्यंत ते नगरसेवक होते. यानंतर २०१७ मध्ये ते शीव प्रभाग क्र. १७५ मधून पुन्हा एकदा निवडून आले आहेत. सातमकर २००४-०५ मध्ये शिक्षण समिती अध्यक्ष होते. त्यानंतर २००६-०७ आणि २००७-०८ असे सलग दोन वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, रस्ते, वाहतूक-पूल, पर्जन्य जलवाहिन्या, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा, घनकचरा व्यवस्थापनासह अनेक दर्जेदार सुविधा मुंबईकरांना देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावून मुंबईकरांना अपेक्षित असणारा विकास करू.

– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती

शिक्षण हक्क कायदा मुंबईसारख्या शहरात संपूर्णपणे अमलात आणणे कठीण असल्याने यातील काही अटी शिथिल करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना आणल्या जातील.

– मंगेश सातमकर, अध्यक्ष, शिक्षण समिती

आज ‘बेस्ट’, सुधार समिती अध्यक्षपदाची निवडणूक

पालिकेच्या ‘बेस्ट’ समिती  अध्यक्षपदाची निवडणूक ६ एप्रिल रोजी ‘बेस्ट’ भवन, कुलाबा येथे होणार आहे. दुपारी ३ वाजता ही निवडणूक होईल. तर सुधार समिती अध्यक्षपदाची निवडणूक दुपारी १२ वाजता महापालिकेच्या मुख्य कार्यालयात होईल. ‘बेस्ट’ समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आशीष चेंबूरकर यांनी तर सुधार समिती अध्यक्षपदासाठी दिलीप लांडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे या दोन्ही अध्यक्षपदांची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक वर्षांनी बिनविरोध

मुंबईच्या विकासात पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे अध्यक्षपदांसाठी होणाऱया प्रत्येक निवडणुकीत विरोधी पक्षांकडून अर्ज दाखल केले जातात. मात्र शिवसेनेने आखलेल्या यशस्वी रणनीतीमुळे या वर्षी विरोधकांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक कित्येक वर्षांनी बिनविरोध झाली.

पालिकेत जल्लोष

मुंबई महानगरपालिकेत ९३ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांची पुन्हा एकदा वैधानिक समित्यांवर निवड झाल्यामुळे महापालिकेत ‘शिवसेना झिंदाबाद’चा नारा घुमला. ढोलताशांचा गजर, जोरदार घोषणाबाजी आणि भगव्या झेंडय़ांसह पालिका परिसरात शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या