पालघर तालुक्यात शिवसेनेचा भगवा फडकला!

43

सामना प्रतिनिधी । पालघर

पालघर जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेनेने विरोधकांना धोबीपछाड देत तब्बल १८ ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा डौलाने फडकवला. यामध्ये केळवे व उमरोळी यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या ग्रामपंचायतीही शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या असून पालघर जिल्ह्यात भगवे तुफानच आले आहे. भाजपला केवळ एका ग्रामपंचायतीमध्येच विजय मिळाला आहे, तर बहुजन विकास आघाडीलाही जबरदस्त तडाखा बसला आहे. शिवसेनेच्या या यशानंतर शिवसैनिकांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष करत विजयाचा गजर केला.

जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. सकाळी १० वाजता येथील आर्यन हायस्कूलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी जिल्ह्यातून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर गर्दी केली होती. किती ग्रामपंचायती आपल्या ताब्यात येतील याची आकडेमोड पदाधिकाऱ्यांच्या मनात सुरू होती, तर गावागावांतील कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचा विजय होईल ना या टेन्शनमध्ये होते. मात्र हळूहळू एकेक निकाल बाहेर येताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. २६ पैकी तब्बल १८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवत शिवसेनेने विरोधकांना जोरदार धोबीपछाड दिले. नगावे ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले असून तिघरे ग्रामपंचायतीत ग्रामविकास आघाडी तर एडवन, माकुनसार, खारेकुरण, भादवे, वाकसई या ग्रामपंचायती बहुजन विकास आघाडीने जिंकल्या. मथाणे येथे सर्वपक्षीयांच्या विकास आघाडीने विजय मिळवला आहे.

किंजळोली पोटनिवडणुकीतही बाजी

महाड – किंजळोली बुद्रुक ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली. प्रभाग क्र. २मध्ये रिक्त झालेल्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत रंजित नरे या बिनविरोध निवडून आल्या, तर स्वाती पार्टे यांनी सर्वसाधारण गटातून प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार प्रतीक्षा रिंगे यांचा ११० मतांनी आघाडी घेऊन पराभव केला आहे. आमदार भरत गोगावले यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बिपीन महामूणकर, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, विभागप्रमुख दत्ताराम फळसकर, पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश महाडिक, वाहतूक

विजयी ग्रामपंचायतींची नावे

केळवे, उमरोळी, पंचाळी, आळेवाडी, मुरबे, कांद्रे, भुरे, मांडे, दातिवरे, वेढी, नांदगाव, वुंâभवली, दापोली, कोलवडे, मोरेकुरण, दांडे, वीराथनबुद्रुक, कोळगाव.

शिवसैनिकांच्या मेहनतीचा फळ

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन तसेच शिवसैनिकांनी केलेल्या मेहनतीमुळेच पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. ही विजयाची पताका यापुढेही अशीच डौलाने फडकत राहील, असा विश्वास ग्रामीण जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी व्यक्त केला.

केवळ एका ग्रामपंचायतीवर होती सत्ता

यापूर्वी केवळ कोळगाव या एकमेव ग्रामपंचायतीवरच शिवसेनेची सत्ता होती, पण शिवसेनेच्या विकासाभिमुख राजकारणामुळे गेल्या काही वर्षांत संपूर्ण जिल्ह्यात भगवा झंझावात सुरू झाला आहे. बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींमध्ये जोरदार मुसंडी मारत शिवसेनेने बहुमताने विजय मिळवला आहे. भाजपला नवापूर ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या