वडवाळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

81

सामना प्रतिनिधी । पैठण

संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या वडवाळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. माजी आमदार संजय वाघचौरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही केवळ स्थानिक शिवसैनिकांच्या बळावर थेट जनतेतून शिवसेनेचे गणेश विष्णू गायकवाड हे विजयी झाले आहेत. तर ९ पैकी ६ जण सदस्यपदी निवडून आले आहेत.

वडवाळी हे गाव जातीय व राजकीय दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केलेले आहे. प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला आघाडी देणाऱ्या या गावातील ग्राम पंचायत ताब्यात घेण्यासाठी यंदा माजी आमदार संजय वाघचौरे यांनी मोठा आटापिटा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण काळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे केले. भाजपाचे लक्ष्मण औटे यांनीही स्वतंत्र पॅनल उतरवल्याने तिरंगी लढत निश्चित झाली.

या पाश्र्वभूमीवर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पॅनलने या निवडणुकीत एकहाती बाजी मारली. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पहिले सरपंच म्हणून शिवसेनेचे गणेश गायकवाड हे निवडून आले. तर सदस्य पदी प्रभाकर पाचे, चंद्रभान घोडके, शांताबाई बर्डे, मुक्ता रामनाथ घोंगडे, रुपाली खोपडे व पुष्पा जाधव हे ६ जण मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. आमदार संदिपान भुमरे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विलास भुमरे, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे व बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांनी अभिनंदन केले आहे.

शिवसेना पॅनलच्या विजयासाठी नंदलाल काळे, मावळते सरपंच सखाराम शिंदे, उत्तम जाधव, शेषराव जाधव, बळीराम जाधव, परसराम खोपडे, बाप्पासाहेब हापसे, भरत काळे, श्याम काळे, संतोष जाधव, मनोज नालकर, लाला खोपडे, राम मैंदड, सुदाम पाचे, शिवाजी पाचे, दत्तात्रय जाधव व अंकुश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या