वीज कंपनीच्या मुजोरीविरोधात शिवसेनेचा ‘बत्ती मोर्चा’

सामना ऑनलाईन, धुळे

दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता आणि वीज वितरण कंपनीकडून शहरात दिवसभरात चार ते पाच तासांचे होत असलेले भारनियमन त्यात एक ते दीड हजार रुपयांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर कारवाई आणि ४० हजार थकबाकी असलेल्या ग्राहकांवर मेहेरनजर अशी दुट्टपी भूमिका घेणाऱ्र्या वीज वितरण कंपनीला शिवसेनेने चांगलाच हिसका दाखवला. २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी शिवसेनेच्या महानगर विभागातर्फे मंगळवारी सायंकाळी वीज कंपनीच्या कार्यालयावर ‘बत्ती मोर्चा’ काढण्यात आला.

धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा सध्या ४३ अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड तापमान आणि उकाडा सहन करीत आहेत. मात्र वीज कंपनीने गळती आणि थकबाकीचे कारण पुढे करीत शहरात जवळपास पाच तास भारनियमन करणे सुरू केले आहे, तर ग्रामीण भागात जवळपास आठ तास भारनियमन केले जात आहे.

वीज कंपनीने सामान्य ग्राहकांबाबत चालविलेली मुजोरी सहन करणार नाही. भारनियमन बंद करून ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. त्यासाठी पक्षाच्या जिल्हा कार्यालयापासून वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बत्ती मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व महानगरप्रमुख सतीश महाले, जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केले. यावेळी माजी आमदार शरद पाटील, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

वीज वितरण कंपनी आपले अपयश लपविण्यासाठी सामान्य ग्राहकांना वेठीस धरीत आहेत. सरासरी दीड हजार रुपये बिल थकले असेल तर वीज कंपनीचे कर्मचारी कार्यतत्पर होऊन त्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करतात. पैसे भरल्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्यासाठी जास्तीचे पैसे आकारतात. मात्र ज्या ग्राहकांकडे ४० हजारांपर्यंत थकबाकी आहे अशा ग्राहकांवर कोणतीही कारवाई होत नाही. केवळ नोटीस देण्याचे धाडसही वीज कंपनीचे अधिकारी-कर्मचारी दाखवत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या