शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय निश्चित

कोकण शिक्षक मतदारसंघाची आज निवडणूक

मतदानासाठी यंत्रणा सज्ज

ठाणे, दि. 2 (प्रतिनिधी) – कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी मतदान होत असून त्यासाठी आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 98 मतदान केंद्रे असून त्यापैकी ठाणे जिह्यात 21 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघातून 10 उमेदवार आपले नशीब अजमावत असून शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रचारात जोरदार बाजी मारली. त्यांना अनेक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिल्याने म्हात्रे यांचा विजय निश्चित मानण्यात येत आहे. 6 फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत मतमोजणी होणार असून  या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

कोकण शिक्षण मतदारसंघात ठाण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिह्यांचा समावेश असून 35 हजार मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी ठाणे जिह्यामध्ये 15 हजार 736 एवढे मतदार असून प्रत्येक मतदार केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम यांनी उद्या होणाऱया मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला असून ही निवडणूक शांततेत पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह लोकभारतीचे अशोक बेलसरे, वेणूनाथ कडू, केदार जोशी, नरसू पाटील, अशोक बहिरराव, बाळाराम पाटील, महादेव सुळे, मिलिंद कांबळे, रामनाथ मोते हे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे म्हात्रे हे गेली 20 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत. गेली अनेक वर्षे हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असूनही आमच्या कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे भगव्याचा सच्चा शेलेदार विधान परिषदेत पाठविण्याचा निर्धार कोकणातील हजारो शिक्षकांनी केला आहे.

सकाळी 8 ते दुपारी 4

उद्या सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. मतदानानंतर सर्व मतपेटय़ा नवी मुंबईच्या सिक्रेट हार्ट हायस्कूलमध्ये आणण्यात येतील. त्याच ठिकाणी सोमवारी 4 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या