कुणाचे वारे आले, कुणाची हवा गेली….ठाण्यात फक्त शिवसेनाच!

37

सामना ऑनलाईन, ठाणे

ठाणे महापालिकेवर आज पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा मोठय़ा डौलाने फडकला. ठाण्यात आज शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर विराजमान झाले. महापौरपदी मीनाक्षी शिंदे यांची तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी अवघी ठाणेनगरी भगव्या तेजाने तळपली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा देण्यासाठी खास ठाणेनगरीत आले. त्यांच्यासोबत
सौ. रश्मी ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही होते. उद्धव ठाकरे यांनी सभागृहात येऊन महापौर मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौर रमाकांत मढवी यांचा भगवी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हा क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी कॅमेऱयाचा लखलखाट केला.

uddhav-thacekray-in-thane-m

एकत्र येऊन काम करूया..

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधी महापौर, उपमहापौरपदांसाठी उमेदवार दिले होते. मात्र त्यांनी आपले अर्ज मागे घेतले, याबद्दल उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचेही आभार मानले. निवडणुकीचा धुरळा आता संपला आहे. आपण एकत्र येऊन काम करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आयुक्त जयस्वाल यांचे कौतुक

ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विकासकामे राबविण्यासाठी दाखविलेल्या धडाडीचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. ते म्हणाले, असे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले तर विकासाचा झंझावात नक्कीच सुरू होतो. असा धडाडीचा आयुक्त मिळणे ही ठाण्याची परंपरा आहे आणि पुढेही ते याच चांगल्या पद्धतीने विकासकामे करवून घेतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या राजकारणावर नंतर बोलेन

मुंबईबद्दल बोला असा आग्रह पत्रकारांनी धरला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई शिवसेनेने जिंकलेलीच आहे. पण त्यावर मी आता बोलणार नाही. एकूण राजकारणावर मी नंतरच बोलेन. आज फक्त आपण ठाण्याच्या आनंदोत्सवात सहभागी होऊया,ठाण्याच्या आनंदोत्सवात सहभागी होऊया.

एकनाथ शिंदे ठाण्याचा खंदा शिलेदार

ठाण्याच्या या विजयात खंदे शिलेदार एकनाथ शिंदे यांचेही कौतुक करतो असे गौरर्वेंद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. ते पुढे म्हणाले, शिवसेनेला विजय मिळाला यासाठी असंख्य नावे घ्यावी लागतील. या सगळ्यांचा विजयात मोलाचा वाटा आहे.

विजयोत्सव साजरा करायला लवकरच येईन!

गेली 25 वर्षे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे अभेद्य नातं आहे. इतकी वर्षे असं कौटुंबिक नातं कुठल्या शहराने  जपलं असेल असं मला वाटत नाही असे सांगतानाच, हा विजयोत्सव साजरा करायला मी लवकरच येईन आणि त्यावेळी ठाणेकरांसमोर नतमस्तक होईन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

समाधान, आनंद या सगळ्या भावना मनात दाटून आल्या आहेत. लोकशाही म्हटली की लढाई आलीच, पण प्रत्येक वेळी अटीतटीच्या लढाईत ठाणेकर नेहमीच भक्कमपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. हा केवळ भावनाबंध नाही, तर ऋणानुबंध आहे आणि ठाणेकरांनी याहीवेळी  तो जपला आहे. माझ्या शिवसैनिकांनाही लाख लाख धन्यवाद! स्वतःची सुखंदुःखं बाजूला ठेवून अविरत मेहनत घेतली. त्यामुळे त्यांना मी मानाचा मुजरा करतो. त्यांच्या विश्वासाला मी तडा काय, पण चराही जाऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले

 ठाणे नगरी भगव्या तेजाने तळपली; पाडव्याआधीच शिवसेनेची विजययात्रा

ठाणे नगरी आज भगव्या तेजाने तळपली. गुढीपाडव्याआधीच ठाण्यात शिवसेनेची विजय यात्रा निघाली. फडकणारे भगवे झेंडे आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या विजय रथावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ठाणेकरांना अभिवादन केले, तेव्हा फटाक्यांची आतषबाजी, तुताऱयांचा निनाद आणि ढोल-ताशांचा गजर झाला. त्या तालावर भगवे फेटे घातलेले शिवसैनिक, भगव्या साडय़ा परिधान केलेल्या शिवसेनेच्या रणरागिणी थिरकल्या तेव्हा हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी अवघी ठाणे नगरी लोटली होती.

ठाण्यात आज शिवसेनेच्या महापौर, उपमहापौर पदांवर शिक्कामोर्तब झाले. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे येणार असल्याने शिवसैनिकांत उत्साहाची लहर पसरली होती. त्यांच्या स्वागताची  जय्यत तयारी करण्यात आली होती.  आनंदनगर चेक नाका येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच भव्य बाईक रॅलीने त्यांचे स्वागत केले. गुलालाची उधळण झाली. बॅण्ड पथकाने त्यांना सलामी दिली. महापालिकेच्या प्रांगणात उभारलेल्या शिवछत्रपतींच्या सिंहासनाधिष्ठाrत पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन केल्यानंतर उद्धव ठाकरे विजयरथावर उभे राहिले. त्यांच्यासोबत सौ. रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. हा विजय रथ महापालिका मुख्यालयापासून निघाला. या भगव्या रॅलीतून शिवसेना झिंदाबाद… असा एकच गजर घुमत होता. उद्धव ठाकरे ठाणेकरांना अभिवादन करत होते. यावेळी त्यांच्याशी आणि आदित्य ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी शिवसैनिक तसेच तरुणांची प्रचंड गर्दी लोटली होती. ठिकठिकाणी या विजय रथावर ठाणेकरांनी पुष्पवृष्टी केली. तब्बल दीड तास ही विजय यात्रा सुरू होती.

भगव्या कमानी, दुतर्फा रांगोळय़ा

ठाण्याच्या चारही वेशींपासून महापालिकेकडे येणारे सगळे रस्ते भगवे झेंडे, भगवे कंदील आणि भगव्या कमानींनी सजले होते. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.  महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हत्तीच्या प्रतिकृती, भगव्या अब्दागिरी, तुताऱया फुंकणारे मावळे, उत्साह टिपेला पोहचविणारे ढोलपथक आणि त्या तालावर भगवे झेंडे फडकवत बेभानपणे नाचणारी तरुणाई आणि शिवसैनिक असा जबरदस्त माहोल होता.

आपली प्रतिक्रिया द्या