लग्नसराईसाठी सज्ज झाली ‘शिवशाही’

सामना ऑनलाईन । मुंबई

परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली एसटीची ‘शिवशाही’ बस प्रवाशांच्या अभूतपूर्व स्वागतानंतर लग्न समारंभ, साखरपुडा, बारसे अशा सोहळ्यामध्ये सन्मानाने मिरविण्यासाठी सज्ज झाली आहे. आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी वातानुकूलित शिवशाही बस ५४ रुपये प्रती किमी दराने लग्न समारंभ, साखरपुडा, बारसे अशा कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली आहे.

आधी लग्नाचे वऱ्हाड एसटीमधून नेणे हे मानाचे समजले जात होते. मात्र लग्नाचे बजेट वाढले आणि अनेकांकडून एसी आरामदायी बसची मागणी येऊ लागली. या मागणीची दखल घेऊन एसटीने ४५ आसनांची ‘शिवशाही’ बस ५४ रुपये प्रती किमी दराने लग्न समारंभ, साखरपुडा, बारसे अशा कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याची योजना सुरू केली आहे. दिवसाला किमान ३५० किमी.चे भाडे भरून प्रचलित प्रासंगिक करार पद्धतीनुसार बस भाड्याने घेता येणार आहे. ज्या आगारात ‘शिवशाही’ बस उपलब्ध आहे त्या आगारात इच्छुकांना योजनेची सविस्तर माहिती मिळू शकेल, असे एसटीच्या जनसंपर्क विभागाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या