बीडसाठीही लवकरच ‘शिवशाही’ सेवा

20

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर आगाराकडून लवकरच बीडसाठी शिवशाही सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयाने ३ शिवशाही बसची मागणी केली असून तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

एसटी महामंडळाने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात वातानुकूलित सेवा देण्यासाठी शिवशाही बसेस प्रवासी सेवेत आणल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या मार्गावरील हिरकणी बसेस बंद करून त्याऐवजी टप्प्याटप्प्याने शिवशाही बस फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहेत. त्यानुसार त्या त्या विभागाला शिवशाही बसेस दिल्या जात आहे. संभाजीनगरच्या दोन्ही आगारांसाठी २२ आणि भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या ६ अशा २८ बसेस देण्यात आलेल्या आहेत. या बसेस सध्या लांब पल्ल्याच्या मार्गावर सुरू आहेत.

महामंडळाने संभाजीनगरहून बीडसाठी अर्ध्या तासाला विनावाहक बससेवा सुरू केलेली आहे. ६ बसेस दिवसभरात २४ फेऱ्या करीत आहेत. या मार्गावरील प्रवाशांचा प्रतिसाद पाहता आता महामंडळाने या मार्गावर ‘शिवशाही’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मार्गावरील लहान मोठ्या गावातील प्रवाशांची तारांबळ होऊ नये यासाठी साध्या बसेसच्या फेऱ्या सुरू ठेवल्या जाणार आहेत. दर अर्ध्या तासाला एक शिवशाही तर एक साधी बसच्या फेऱ्या केल्या जाणार आहेत. मागणी करण्यात आलेल्या शिवशाही बसेस येताच ही सेवा सुरू केली जाणार असल्याचे महामंडळ अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या