मंडळ नव्हे, माहेरच! महिलांच्या कलागुणांना वाव देणारे कुर्ल्यातील शिवसृष्टी महिला मंडळ

– अनघा सावंत

महिला मंडळ म्हणजे, जिथे स्त्रीला आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करता येतात, तिचे कलागुण जोपासले जाऊन तिची उन्नती होते आणि मुख्य म्हणजे काही क्षण ती स्वतःसाठी जगते, असे हक्काचे ठिकाण. म्हणूनच कित्येक मंडळे अनेक दशकांची वाटचाल करताना दिसतात. असेच एक मंडळ म्हणजे कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी महिला मंडळ.

शिवसृष्टी महिला मंडळाची स्थापना नवरात्रीत 1980 साली सुलोचना नाझरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला कुर्ल्यातील एका पटांगणात किंवा गणेश मंदिरात, तर कधी डॉ. औरंगाबादकर या सभासदाच्या घरी महिला मंडळ भरत असे. नाझरे ताईंनी तसेच सर्वांनीच महिला मंडळाला हक्काची जागा मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. 2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सहकार्याने मंडळाला हक्काची जागा मिळाली.

मंडळाच्या सचिव सुनंदा रानडे म्हणाल्या, ‘‘मंडळात जवळजवळ 200 च्या वर भगिनी आहेत. आमच्या मंडळातील प्रत्येक सभासद महिलेसाठी हे मंडळ म्हणजे माहेरच आहे. प्रत्येक स्त्री माहेरी आल्यावर जसे मोकळेपणाने बोलते, आपल्या भावना व्यक्त करते. अगदी तसंच इथल्या प्रत्येक जणी आपली सुखदुःखं वाटून घेतात.’’

संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने मंडळात दासबोध सप्ताह व इतर आध्यात्मिक प्रवचने ठेवली जातात. नवरात्रीत तीन दिवस वार्षिक उत्सव होतो. या उत्साहात गाण्यांचे कार्यक्रम, विविध खेळ घेतले जातात. मंडळात ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, सुधीर गाडगीळ या दिग्गजांच्या मुलाखती झाल्या असून सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडवणारे व्याख्यानही झाले आहे. त्याचप्रमाणे भाऊ मराठे, विकास सबनीस, विश्वास मेहेंदळे, योगातज्ञ उल्का नातू हे मान्यवरही मंडळात येऊन गेले आहेत.

मंडळात वर्षातून एकदा आवर्जून आवळी भोजन केले जाते. यात प्रत्येक भगिनी आवळय़ाचे वेगवेगळे पदार्थ घेऊन येतात आणि एकत्रित भोजन करतात. तसेच ‘बहुगुणी आवळय़ाचे महत्त्व’ यावर विषयावर आयुर्वेदिक तज्ञाचे भाषणही ठेवले जाते. ‘‘मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा पानसरे, उपाध्यक्ष उषा भावे, सल्लागार सविता दाबके आणि सुधा शेणाय यांच्या परिश्रमाने मंडळ उत्साहाने ध्येयमार्गक्रमण करत आहे,’’ असे सचिव सुनंदा यांनी सांगितले.

– मंडळातर्फे ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची शंभर पुस्तके असलेली पेटी मागविली जाते. ती पेटी डिपॉझिट देऊन महिनाभर मंडळात ठेवली जाते. या महिनाभरात भगिनी त्यांना हवी ती पुस्तके वाचण्यासाठी घेऊन जातात. अशा प्रकारे मंडळातर्फे भगिनींची वाचनाची आवड विनामूल्य पुरवली जाते. याशिवाय नृत्य, योगा, हस्तकला यांच्या कार्यशाळाही घेतल्या जातात. पाककला स्पर्धा तसेच बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान याविषयी चाचणी पेपर देऊन स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात.

– सामाजिक कार्यातही मंडळ अग्रेसर असून सुरुवातीला महानगरपालिकेच्या शाळेतील मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘स्वाधार’ या संस्थेमधील पाच मुलींना दत्तक घेऊन त्यांचा दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मंडळ उचलते. तसेच प्रतिवर्षी एखाद्या अनाथाश्रम अथवा वृद्धाश्रमाची माहिती घेऊन त्यांना 10 हजार रुपयांची मदत केली जाते. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थी आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ महिलांचे सत्कार मंडळातर्फे केले जातात.