आदर्श खेळाडूकडून थोडे तरी शिक, शोएबचा बाबर आझमला ‘विराट’ सल्ला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तान माजी गोलंदाज आणि ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शोएब अख्तरने पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याला ‘विराट’ सल्ला दिला. बाबर आझमने आपला आदर्श खेळाडू विराट कोहलीसारखे खेळायला हवे. सामना कोणत्या परिस्थितीत आहे हे जाणून चांगल्या सुरुवातीचा फाय़दा घेऊन मोठी खेळी करायला हवी, असा सल्ला शोएब अख्तरने बाबर आझमला दिला. बाबर आझम पाकिस्तानचा महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु तो सामना शेवटपर्यंत खेचू शकत नाही, असेही शोएब अख्तर म्हणाला.

एका मुलाखतीत बाबर आझमने मी विराटच्या फलंदाजीचे व्हिडीओ पाहून त्याच्यासारखी फलंदाजी शिकत असल्याचे म्हटले होते. याचाच दाखला देत शोएब अख्तर म्हणाला, जर तू विराट कोहलीला आदर्श मानत असेल तर त्याच्यासारखी फलंदाजी करायला शिक. विराटने बिकट परिस्थिती धावांचा पाऊस पाडला आहे. बाबर आझमला विराटप्रमाणे धावा करण्याची आणि त्याच्याप्रमाणे फलंदाजीत नवेपण आणण्याची गरज आहे.

शोएब पुढे म्हणाला, विराट कोहली, रोहित शर्मा आणि केन विलियम्सन यासराख्या खेळाडूंकडे पाहिले तर हे खेळाडू अर्धशतकर बनवल्यानंतर वेगाने धावा जमवतात आणि मोठी खेळी खेळतात. बाबर आझमला या खेळाडूंकडून शिकण्याची आवश्यकता आहे. बिकट परिस्थितीत फलंदाजी करताना त्याच्याकडे भरपूर फटके असायला हवे.