…तर कंगनासोबत शोएब अख्तरने केले असते बॉलीवूडमध्ये पदार्पण

सामना ऑनलाईन । मुंबई

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशा अनेकदा चर्चा रंगल्या मात्र अद्याप शोएबनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. 2006 मध्ये शोएबला प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांनी एक चित्रपट ऑफर केला होता. त्या चित्रपटाची ऑफर जर शोएबने स्वीकारली असती तर त्यानं अभिनेत्री कंगना रनौतसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं असतं.

‘गँगस्टर’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी महेश भट्ट यांची पहिली पसंती शोएब अख्तर याला होती. त्यांनी तशी ऑफरही शोएबला दिली होती. मात्र शोएबने ती ऑफर नाकारल्याने त्याच्या जागी शायनी अहुजाची वर्णी लागली. शोएबने नाकारलेला हा चित्रपट नंतर सुपरहिट ठरला होता. तसेच त्यातील दया शंकरच्या भूमिकेमुळे शायनीचा बॉलीवूडमधील भाव वधारला.

शोएब अख्तरने स्वत: एका मुलाखतीत याबाबत सांगितले आहे. ‘महेश भट यांनी मला या त्यांच्या एका चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र क्रिकेट माझं सर्वस्व असल्याने मी त्यांची ऑफर नाकरालेली. त्यानंतरही मला अनेक ऑफर आल्या.’, असं शोएबने एका मुलाखतीत सांगितलं. मात्र शोएब अख्तरनं मागितलेलं मानधन महेश भट्ट यांनी नाकारल्यामुळे त्यानं या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे समजतं. शोएबनं या चित्रपटासाठी आठ कोटी रुपये मागितले असल्याचं समजतं.