चार दशकांचा कलाप्रवास, जहांगीर कलादालनात शोभा पत्की यांचे चित्रप्रदर्शन

पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार शोभा पत्की यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात 29 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. गेल्या 40 वर्षांच्या कला प्रवासात त्यांनी काढलेल्या विविध विषयांवरील, वेगवेगळ्या माध्यमांतील आणि शैलीतील चित्रांचा समावेश प्रदर्शनात आहे. 5 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.

या प्रदर्शनात शोभा पत्की यांनी ज्यूट, प्लॅस्टर, कापड, माती, अॅल्युमिनियम, तेलरंग, मिक्स मीडियम वगैरे माध्यमांचा कलात्मक वापर केला असून आपली आशयघन चित्रे साकारली आहेत. चित्रसंवेदना जशी बाह्य अनुभवातून मिळते तशी अंतर्मनातही निर्माण होते. त्यामुळे प्रतीकात्मक व अमूर्त अशी चित्र निर्मिती चित्रकाराच्या अभिव्यक्तीतून होत असते. त्यासाठी साधना व चिंतन आवश्यक असून त्यांचा योग्य तो परिणाम चित्रात दिसून येतो, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या चित्रसंपदेत हिंदुस्थानी संस्कृती व परंपरा, धार्मिक संकल्पना, निसर्गवैभव, ऋतुचक्र, रागमाला, ब्रह्मांड वगैरेंचे दर्शन घडते. हे प्रदर्शन दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांसाठी खुले आहे.