पंजाबचे मुख्यमंत्री बादल यांच्यावर तरुणाने बूट फेकला

सामना ऑनलाईन । चंदिगड

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्यावर एका सभेत तरुणाने बूट फेकला आहे. बादल यांचा मतदारसंघ असलेल्या लाम्बी-रट्टाखेडा येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बादल बोलत असताना गर्दीतील एका तरुणाने अचानक त्यांच्या दिशेने बूट भिरकावला. यात बादल यांचा चश्मा फुटला असून त्यांच्या हातालाही लागले आहे.त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली आहे.

पंजाबमध्ये ४ फेब्रुवारीस विधानसभा निवडणूका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर पंजाबमध्ये विविध ठिकाणी सर्वच नेत्यांच्या त्या त्या मतदारसंघात सभा होत आहेत.यावेळी पहिल्यांदाच आपही पंजाबमध्ये निवडणूक लढवत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवालही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी बादल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला असून टीकाही केली आहे. यामुळे बादल समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यावरुन आप व बादल समर्थकांमध्ये बाचाबाचीच्या घटनाही घडल्या आहेत. यातूनच ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.