लागीरं झालं जीच्या आधी सुरू झालं होतं या चित्रपटाचं शूटिंग, आता होणार प्रदर्शित

11

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या फिल्मी विश्वात चर्चेत असलेला चित्रपट ‘पळशीची पीटी’ एक वेगळ्या गोष्टीमुळे देखील चर्चेत आहे. सोशल मीडियावर एक एक करत दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी कलाकारांच्या रूपाने सगळे पत्ते खोलले आणि सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. सुप्रसिद्ध मालिका ‘लागीर झालं जी’ मधील जेमतेम सर्वच कलाकार या चित्रपटात आहेत. मालिका संपल्यावर काय असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना होताच, पण यावर दिग्दर्शकांनी मौन सोडलं आहे.

खरं तर ‘लागीर झालं जी’ मालिका सुरू होण्याआधीच सर्व कलाकार पळशीची पीटीसाठी काम करत होते. फिल्मचं लोकेशन साताऱ्यात असल्या कारणामुळे मालिकेसाठी ऑडिशन देणं सर्वांना सोईस्कर झालं. सर्व कलाकारांच्या उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांना मालिकेतदेखील संधी मिळाली आणि या संधीचे सोने केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेच!

दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट ‘पळशीची पीटी’ मध्ये ‘भागी’ ची भूमिका साकारणारी किरण ढाणे, राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे, विद्या सावळे, शिवानी घाटगे , दिक्षा सोनवणे, निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे तसेच तेजपाल वाघ यांनीदेखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून लागीरं…मध्ये ‘जितू काका’ यांची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच एडिटिंग केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व लागीरंची टीम प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार झालेली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.