कल्‍याण, डोंबिवलीतील दुकाने दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत बंद राहणार; गर्दी टाळण्यासाठी उपाय

361
file photo

विविध चौक, रस्ते, दुकाने बाजारपेठा येथे होणारी गर्दी टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील सर्व दुकाने शुक्रवारपासून दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे . त्यातून दूध डेअरी, मेडिकल स्टोअर, रुग्णालय , दवाखाना आदींना वगळण्यात आले आहे. साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा महापालिका क्षेत्रासाठी लागू करण्‍यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून कल्‍याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक आदेश लागू करण्‍यात आले आहेत.

रुग्णांची संख्या वाढली
महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 43 वर गेली आहे. कोरोना रुग्णांमध्ये पाच नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. तरीही लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसून अनेकजण विनाकारण रस्त्यांवर दिसत आहेत. तसेच गर्दी कमी करण्यासाठी आता दुपारच्या वेळेत दुकाने बंद करण्यात येणार आहेत.

कडक कारवाई करणार

नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी 10 एप्रिलपासून दररोज दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मेडिकल स्टोअर्स, रुग्‍णालये, क्लिनीक, एल.पी.जी. गॅस व उद्वाहन वगळता सर्व जीवनावश्‍यक वस्‍तू, बेकरी, किराणा दुकाने, भाजीपालासह व्‍यावसायिक दुकाने बंद ठेवण्‍यात येणार आहेत. दुकानदारांनी वा संबंधितांनी या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास कलम 188 नुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या