मुंबई आता खरंच ‘जागी’ राहणार!

14

सामना ऑनलाईन । मुंबई

कधीही न झोपणारे शहर अशी मुंबईची ख्याती असली तरी यापुढे मुंबई आता खरंच ‘जागी’ राहणार आहे. दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृहे, मेडिकल दुकाने २४ तास सुरू ठेवण्याबाबतच्या विधेयकावर विधिमंडळात शिक्कामोर्तब झाले आहे. २४ तास काम करणाऱ्या मुंबईकरांना या सेवा २४ तास मिळाव्यात अशी भूमिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. ती आता प्रत्यक्षात आली आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणत सुरुवातीला नाइट लाइफ संकल्पनेला काही लोकांनी विरोध केला होता. मात्र राज्य सरकारने तयार केलेल्या विधेयकाला पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळाली. सतत कार्यरत असलेल्या मुंबईसाठी ‘मुंबई २४ तास’ हे धोरण याआधीच शिवसेनेने महापालिकेत आणले. २०१६ साली केंद्राने कायदा केल्यानंतर आता या विधेयकाला राज्य सरकारचीही मंजुरी मिळाली आहे. या विधेयकानुसार आता २४ तास आस्थापने सुरू ठेवणाऱ्यांना कर्मचाऱयांकडून तीन शिफ्टमध्ये काम करून घ्यावे लागणार आहे. सुरक्षेबाबत गृह विभागाकडूनही उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे निवासी परिसरात ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठीही तरतूद कायद्यात आहे.

‘आहार’कडून स्वागत
राज्य सरकारच्या या निर्णयाचे आणि शिवसेनेच्या भूमिकेचे हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने स्वागत केले आहे. या कायद्याचा सर्वच मुंबईकरांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया ‘आहार’चे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी मांडली आहे. विमानाने किंवा रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अनेकदा लांबतो, फ्लाइट किंवा गाड्य़ा लेट होतात. अशा वेळी विमानतळ किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ मिळतातच. तिथे चांगलेच आणि स्वस्त मिळतील याची खात्री नसते. बाहेर उपाहारगृहे सुरू राहिली तर अशा परिस्थितीत फायदा होईल, असेही ते म्हणाले.

आता मुंबई अधिक सुरक्षित होईल!
विधेयक मंजूर झाल्यामुळे आता कानाकोपऱ्यात लपूनछपून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना आता रात्रीच्या वेळीही खुलेआम खाद्यपदार्थ विकता येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कोणत्याही वेळी आपली भूक भागविता येईल. त्याचप्रमाणे मोठ्य़ा प्रमाणात रोजगारही निर्माण होणार असल्याने खऱ्या अर्थाने मुंबई अधिक सुरक्षित होईल. प्रामुख्याने अनिवासी भागातील हॉटेल्स, मॉल्स, मेडिकल्सना परवानगी मिळावी हीच भूमिका असल्याची प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

सध्या ऑनलाइन खरेदी-विक्रीमुळे ऑफलाइन मार्केट मागे पडले आहे. नवीन कायद्यामुळे दुकाने आणि आस्थापनांना या स्पर्धेत टिकाव धरणे शक्य होणार आहे आणि रोजगार निर्मिती होईल. श्रीमंतांचे नाइट लाइफ असते, मात्र सर्वसामान्य मुंबईकरांची या कायद्यामुळे अनेक बाबतीत सोय होणार आहे. दिवसभर कामावर असणाऱ्या मुंबईकरांना रात्रीसुद्धा खरेदी करता येणार आहे, रात्री-अपरात्री खाद्यपदार्थ उपलब्ध होऊ शकणार आहेत. मुंबईत दिवसा रेल्वे, रस्ते यावर प्रचंड गर्दी आणि रात्री सामसूम, दक्षिण मुंबईसारखे परिसर आठ वाजल्यानंतर चिडीचूप होतात. मुंबई २४ तास जागी राहिली तर हा विरोधाभास दूर होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या