‘आरसा’ ठरली उत्कृष्ट कलाकृती! राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात विविध विभागांत बाजी

सामना ऑनलाईन, मुंबई

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सॅनफान्सिस्को, न्यूयॉर्क, टोरँटोसारख्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात घवघवीत यश मिळवल्यानंतर ‘आरसा’ या लघुपटाने नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही मोहोर उमटवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात या लघुपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांची वाहवा मिळवत उत्कृष्ट कलाकृती आणि उत्कृष्ट पटकथा या दोन विभांगामध्ये पुरस्कार पटकावले आहेत.

मध्यमवर्गीय कुटुंबातला सर्वसामान्य मुलगा उदरनिर्वाहासाठी डान्स क्लासमध्ये नोकरी करतो. तेथे नाचणाऱ्या नर्तकींमध्ये तो स्वतःचे प्रतिबिंब पाहतो. त्या मुलींना नाचताना पाहून आपणही त्यांच्यासारखा पोशाख घालून नाचण्याची त्याची इच्छा होते. परंतु समाजबंधनामुळे तो आपली इच्छा मनातच ठेवतो. आपली सुप्त इच्छा तो कशा प्रकारे पूर्ण करतो, हे या लघुपटात दाखवण्यात आले आहे.

‘हॅपी लकी’ एंटरटेनमेंट या बॅनरखाली संजय महाले आणि अदिती भागवत यांनी लघुपटाची निर्मिती केली असून रतीश पाटील सहनिर्माते आहेत. १८ मिनिटांच्या या इंग्रजी लघुपटाचे दिग्दर्शन अमेरिकन दिग्दर्शक कावा हतेफ यांनी केले आहे. आजवर या लघुपटाने सात आंतरराष्ट्रीय, दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. अदिती भागवत, मानव चौहान या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

‘आरसा’ या लघुपटाच्या माध्यमातून अत्यंत वेगळा विषय मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या लघुपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आगामी काळात कान्स फेस्टिव्हलमध्ये हा लघुपट पाठवण्याची आमची इच्छा आहे. – संजय महाले, निर्माते

आपली प्रतिक्रिया द्या