२२ डिसेंबरपासून ‘प्रयोग’चा ‘फिल्मिंगो’

8

सामना ऑनलाईन । मुंबई

चित्रपट क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱया तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ निर्माण करावे हे ध्येय समोर ठेवून ‘प्रयोग मालाड’ या संस्थेतर्फे ‘फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवा’चे आयोजन केले जाते. यंदा २२ ते २४ डिसेंबरदरम्यान नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा महोत्सव रंगणार आहे.

‘प्रयोग मालाड’ ही संस्था गतवर्षीपासून फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करीत आहे. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक व समीक्षक अशोक राणे यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व या महोत्सवासाठी लाभले आहे. यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन २२ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. लघुपटांचे प्रदर्शन २३ आणि २४ डिसेंबर डिसेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. पुरस्कार वितरण सोहळ्याला दिग्दर्शक एन. चंद्रा, किरण शांताराम व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

या लघुपट महोत्सवातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, पटकथा लेखक, संपादक, अभिनेता आणि अभिनेत्री असा सहा वैयक्तिक पुरस्कारांचा समावेश आहे. परीक्षक म्हणून रघुवीर कुल, रेखा देशपांडे, अनंत अमेंबल, अरुण गोंगाडे, आणि अवधूत परळकर काम पाहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९२०७५९६५९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– या वर्षी या महोत्सवात देशविदेशातून एकूण १५९ लघुचित्रपट दाखल झाले असून त्यामध्ये हिंदुस्थानसमवेत इंग्लंड, अमेरिका, इटली, यू.ए.ई., ऑस्ट्रिया, कॅनडा आणि श्रीलंका येथील स्पर्धकांचा समावेश आहे.

– महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या ५ लघुचित्रपटांना ३ लाख रुपयांपर्यंतची रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, त्याचबरोबर त्यांचे लघुपट प्रतिष्ठत ‘कान्स’ फेस्टिवलमध्ये पाठविण्याची जबाबदारी संस्था स्वीकारणार
आहे.

आपली प्रतिक्रिया द्या