छोटीशी गोष्ट

263

एकदा सूर्य रुसून बसला!, एकनाथ आव्हाड

मे महिन्याचा कडक उन्हाळा सुरू. दुपारची वेळ. बाळू घामाघूम होऊन दारात उभा. त्याच्यासोबत एक वयस्कर गृहस्थ, थोडेसे अस्वस्थ अवस्थेत. बाळूने आईला घाईनेच हाक मारली, ‘आई, ए आई. अगं जरा बाहेर ये ना.’ आई घरातून दारात आली. तेवढय़ात ते उभे असणारे गृहस्थ मटकन खालीच बसले. बाळूने त्यांना पटकन सावरले. आईच्या मदतीने घरात आणले. बाळू आईला म्हणाला, ‘अगं, वाटेत अचानक चालता चालता बसले. मी विचारलं त्यांना, काका, काय झालं आपल्याला? बरं वाटत नाही का?’ तर ते म्हणाले, ‘भोवळ आल्यासारखी आहेत उन्हानं. पाणी हवंय, घशाला कोरड पडलीय! म्हणून आई मी त्यांना आपल्याकडं घेऊन आलोय. तू थोडं पाणी आणतेस का यांच्यासाठी?’ आईने लगेच ग्लुकॉन-डी पावडर टाकून थंडगार पाणी आणलं. त्या गृहस्थाला दिले. थोडय़ा वेळाने त्या गृहस्थाला बरे वाटले. आईकडे पाहून ते म्हणाले, ‘मुलगा फार गुणाचा आहे हो तुमचा! बाळा नाव काय तुझं?’

‘मी बाळू. म्हणजे घरात बाळू अन् शाळेत शुभम.’ ‘बरं, बरं!’ हसत ते उठले. ‘देव तुझं भलं करो. आता बरं वाटतंय मला, येतो मी!’ धन्यवाद देऊन ते गृहस्थ निघून गेले.

बाळूने स्वच्छ हात-पाय-तोंड धुतले. टॉवेलने तोंड पुसता पुसता तो आईला म्हणाला, ‘आई केवढा गं उन्हाळा? उन्हाचा पारा ४० च्या वरच. सूर्य नुसती आग ओकतोय.’ आई नुसतं हूं म्हणाली. दिवसभर बाळूला त्या गृहस्थाचा उन्हाने अस्वस्थ झालेला चेहरा दिसत होता आणि सूर्याचा राग येत होता. त्या रात्री तो नीट झोपलाच नाही.

बाळूचा राग सूर्याला कळला की काय? दुसऱया दिवशी सूर्य उगवलाच नाही. सगळीकडे नुसता अंधार. २४ तास आता केवळ रात्र… अतोनात थंडी वाढली. सूर्यप्रकाश नाही म्हणून झाडांची वाढ खुंटली. बाळूला विचार पडला, सूर्यप्रकाश नाही तर आता पाण्याची वाफ कशी होईल? वाफ नाही तर पाऊस धरणीवर कसा येईल? आणि पाऊस नाही तर मग ही धरणी हिरवीगार कशी दिसेल? ऋतुचक्र थांबून तर एकाच जागी गप्प बसेल. आता सूर्योदय-सूर्यास्ताचा कसा मेळ होणार? रोज नव्या दिवसाची आता कोण चाहूल देणार? काळय़ाकुट्ट अंधारात मग कशी सापडेल वाट? सूर्य नसला तर मग साऱयांचीच लागेल वाट. एक ना दोन केवढे प्रश्न बाळूकडे येऊन बसले, पण उत्तर सापडेना.

बाळूने मोठ्ठय़ाने आवाज दिला, ‘सूर्यदादा, रुसू नको रे माझ्यावर. ये रे लवकर.’ आई बाळूला म्हणाली, ‘बाळू, अरे काय बोलतोस?’ आईने त्याला झोपेतून उठवतच विचारले तेव्हा बाळूला कळलं की, आपण स्वप्न पाहिले होते. स्वप्नात सूर्य रुसला होता, सत्यात नाही. कारण पहाटेचा सूर्यप्रकाश घरात केव्हाच शिरला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या