हॅप्पी जर्नी आई

60

नीलेश मालवणकर, [email protected]

द्यायला हवे होते आईंना पैसे,’ मेधा आशीषला म्हणाली.

‘काय बोलते आहेस तू? एवढे पैसे  खर्च करायचे? तेसुद्धा फालतू फिरण्यासाठी?’

‘फालतू कसं म्हणता? त्या एवढय़ा राब राब राबतात घरासाठी. आपण दोघे कामावर गेल्यावर अनन्याला सांभाळतात. तुमचे वडील गेल्यावर त्यांनी कष्टाने नोकरी करून सांभाळलं तुम्हाला. कधी हौसमौज ती नाहीच. आता या वयात बरोबरीच्या बायकांसोबत सीनियर सिटिझन्स टूरला जावंसं वाटलं तर त्यात बिघडलं कुठे?’

‘अगं पण असे अचानक पन्नासेक हजार रुपये काढायचे म्हणजे आपलं महिन्याचं बजेट ढासळणार. शिवाय पुढच्या महिन्यात अनन्याला हॉबी क्लासला घालायचंय त्याचं काय?’

‘निघेल

काहीतरी मार्ग. काही महिने पुढे

ढकलू हॉबी क्लासला जाणं. तुम्हीसुद्धा काही महिने ओव्हरटाइम करा.’

आशीषने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिच्याकडे पाठ केली आणि पुढच्याच क्षणी तो घोरू लागला. त्याची झोप अगदी हुकमी होती. मेधाने असहायपणे एक सुस्कारा सोडला. आशीषच्या आईचा-मालतीबाईंचा हताश चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. दुसऱया दिवशी नेहमीप्रमाणे आशीष कामावरून परतला. सीरियल्स पाहून झाल्या तसे सर्व जेवायला बसले. जेवता जेवता अनन्याने त्रासिकपणे वर पाहिलं.

‘काय गं बबडय़ा, काय झालं?’ आशीषने प्रेमाने विचारलं.

‘बाबा, तो पंखा..’

‘काय झालं त्याचं?’

‘तो किती कुरकुरतोय बघ ना.’

‘हा। हा। हा। आशीष हसत हसत अनन्याला समजावू लागला, ‘बबडय़ा, थोडासा कुरकुरणारच. बरीच वर्षं झाली त्याला असा फिरतोय तो. बरेच कष्ट केलेत त्याने.’

‘म्हणजे आपल्या आज्जीसारखं का रे बाबा?’ आशीषने चपापून अनन्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱयावर निरागस भाव होते.

‘बाबा, तो आवाज करायला नको यासाठी काय करायचं?’

‘त्यासाठी त्यात वंगण घालायला हवं.’

‘वंगण म्हणजे काय रे बाबा? त्याने काय होणार?’

‘वंगण तेलासारखं असतं. ते ठराविक काळाने पंख्याला द्यायची गरज असते. वंगण घातलं की बघ, पंखा कसा ताजातवाना होईल. एकदम स्मूद चालायला लागेल, कुरकुर न करता.’

‘अरे वा. मज्जाच आहे.’ अनन्या टाळ्या पिटत म्हणाली.

सकाळी मालतीबाई उठल्या. चष्मा घेण्यासाठी त्यांनी हात लांबवला. चष्म्याखाली एक कागदी एन्व्हलप होतं. चष्मा डोळ्यावर चढवून त्यांनी एन्व्हलप उघडलं. आत एक चेक होता. त्यावर खाली आशीषची लफ्फेदार सही. आतमध्ये एक छोटीशी चिठ्ठीसुद्धा होती. त्यावर तीनच शब्द आशीषच्या हस्ताक्षरात होते – ‘‘हॅप्पी जर्नी, आई!’’

आपली प्रतिक्रिया द्या