गुढीपाडवा… नीट बोल…

नीलेश मालवणकर,nmmalvankar@gmail.com

मंदार, एक गंमत सांगू?’’ रियाने डोळे मिचकावत विचारलं. “सांग.’’

“आज कोणता सण आहे?’’

“गुढीपाडवा,’’ मंदार बोलला.

“नीट बोल गाढवा,’’ रिया म्हणाली आणि खिदळत हसू लागली. नवऱयाला ‘गाढव’ बनवल्याचा आनंद तिच्या चेहऱयावरून ओसंडून वाहत होता. मंदार तिच्या पाठीत लाडिक बुक्का मारण्यासाठी धावून आला, पण अचानक थबकला. रियाने मागे वळून पाहिलं, तर तिथे सासूबाई उभ्या होत्या.

ती मंदारला गाढव म्हणाली हे सासूबाईंनी ऐकलं होतं. त्यांचा गंभीर चेहरा अतिगंभीर झाला होता. ती मंदारला एकेरी नावाने हाक मारते, हेसुद्धा त्यांना पसंत नव्हतं. त्यांनी तसं तिला आडून सुचवलंदेखील होतं.

“सूनबाई, ती गुढी उभारा लवकर,’’ त्या गंभीरपणे म्हणाल्या.

“बरं आई,’’ ती म्हणाली आणि ती तिकडून सटकणार तेवढय़ात सासरेबुवा वर्तमानपत्र सांभाळत तिथे अवतरले.

“अरे घरातल्या गुढीचं काय घेऊन बसलात? आपल्या सूनबाईने समाजात आपल्या कर्तृत्वाची गुढी उभारलीय.’’

“म्हणजे काय?’’ सर्वांनी कुतूहलाने विचारलं.

“हे बघा. आजच्याच पेपरात आलंय. आपल्या सूनबाईने गरीब बायकांना लघुद्योगाद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला, त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांतर्फे लवकरच तिचा सत्कार होणार.’’

एरवी मंदारने रियाला मिठीत घेतलं असतं. पण सर्वांसमोर तो “अरे वा, अभिनंदन रिया,’’ एवढंच बोलून गप्प बसला.

“छान सूनबाई. अशीच प्रगती कर,’’ सासूबाईंनी गंभीरपणे रियाला मोजक्याच शब्दांत शाबासकी दिली.

“आई माझ्यावर रागावल्यात,’’ रिया मंदारला म्हणाली.

“कशासाठी?’’

“मी तुला गमतीत ‘गाढव’ म्हणाले ते त्यांना आवडलं नाही बहुतेक.’’

“त्याचं मनावर घेऊ नकोस.’’

“पण मलाच थोडंसं अपराधी वाटतंय. मी तुला एकेरी नावाने हाक मारली किंवा तुला काही बोलले, तरी नवरा म्हणून तुझ्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे, हे त्यांना समजावून सांगायला हवं.’’

“दुपार झाली. ती झोपली असेल.’’

“बघते जाग्या आहेत का आणि बोलून टाकते.’’

“ठीकाय.’’

सासूबाईंच्या बेडरूमचा दरवाजा किलकिला उघडा होता. दारावर टकटक करण्यापूर्वी रिया काही क्षण दाराबाहेर रेंगाळली. तेवढय़ात आतून सासूबाईंचा मिस्कील भासणारा आवाज ऐकू आला. त्या सासरेबुवांशी बोलत होत्या.

“अहो रागवणार नसाल तर एक गंमत करू?’’

“बोला,’’सासरेबुवा म्हणाले.

“पटकन सांगा – आज कोणता सण आहे?’’

“गुढीपाडवा,’’ सासरेबुवा उत्तरले.