गोळ्या सदा सरवणकरांच्याच बंदुकीतून झाडल्या गेल्या, पोलिसांना प्राप्त झाला बॅलेस्टीक अहवाल

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मिंधे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार केला होता. या गंभीर घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी बॅलेस्टीक तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली होती. बॅलेस्टीक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून जी पुंगळी पोलीस ठाण्याबाहेर सापडली होती ती सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून झाडण्यात आली होती असे यात म्हटले आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी सरवणकर यांचे पिस्तुल जप्त केले होते आणि ते कलिन्यातील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले होते. दादर पोलीस ठाण्याबाहेर सापडलेली पुंगळी ही याच पिस्तुलातून झाडण्यात आली होती असे सखोल तपासणीनंतर दिसून आले आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न फुटीर आमदार सदा सरवणकर समर्थकांच्या चांगलाच अंगाशी आला होता. शिवसैनिकांनी या चिथावणीखोरांना शिवसेना स्टाईल इंगा दाखवत त्यांची जागा दाखवून दिली होती. मात्र हे पचनी न पडलेल्या फुटीर आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून प्रभादेवी तसेच पोलीस ठाण्याबाहेर फायरिंग केली होती. त्यांची ही कृती त्यांच्या चांगलीच अंगलट आली होती. गोळीबार करणाऱ्या सरवणकरांविरोधात गुन्हा दाखल करा, शिवसैनिकांविरोधातील खोटे गुन्हे मागे घ्या, या मागणीसाठी शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन तास ठिय्या देत फुटीरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. ज्यानंतर सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि शिवसैनिकांविरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात आले.

मी गोळीबार केलाच नाही असं सांगण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पिस्तूल दादर पोलिसांनी गोळीबाराच्या घटनेनंतर जप्त केले होते. या पिस्तुलाची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे दादर पोलिसांनी सांगितले होते. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला असून ही गोळी सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून झाडली गेली असल्याचे कळाल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

गणपती विसर्जना दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना व मिंधे समर्थकांमध्ये वाद झाला होता. विनाकारण वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या शिंदे गटाच्या चिथावणीखोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मग शिवसेना स्टाईलने चांगलाच इंगा दाखवला होता. हा वाद पोलीस ठाण्यात गेला असता त्यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्याच्या आवारातच त्यांच्याकडील परवाना असलेल्या पिस्तुलातून जमिनीवर एक गोळी झाडली होती होती.