कुलगुरू देशमुखांनी बॅगा भरल्या!

15

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई विद्यापीठाचे टीवायचे निकाल जाहीर करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना अजूनही तब्बल १५० हून अधिक निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे १५ ऑगस्टची तिसरी ‘डेडलाइन’ही हुकणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यातच निकाल रखडवल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना झालेल्या मनःस्तापाला जबाबदार धरून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे. एकीकडे कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवले असताना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवल्यामुळे आता कुलगुरूंना हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे विद्यापीठात बोलले जात आहे.

मुंबई विद्यापीठाचे जूनमध्ये जाहीर होणारे टीवायचे निकाल या वर्षी ऑगस्टच्या मध्यावरही जाहीर झालेले नाहीत. याला कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मनमानीपणे घेतलेला ऑनलाइन पेपर तपासणीचा निर्णयच कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. याची गंभीर दखल घेत विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरूंची खरडपट्टी काढून निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. मात्र कुलगुरूंनी वाढवून मागितलेली ५ ऑगस्टची दुसरी डेडलाइन चुकली असून विद्यापीठाने स्वतः जाहीर केलेली १५ ऑगस्टची डेडलाइनही चुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठात अशी गंभीर स्थिती असताना कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून कुलगुरूपदाचा प्रभारी कारभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यातच आता खुद्द राज्यपालांनीच कुलगुरूंना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवल्यामुळे आता कुलगुरू हटवण्याची हालचाल सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार कुठल्याही कुलगुरूला बेजबाबदारपणाबद्दल थेट हटवता येत नाही. त्यासाठी आधी ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात येते. त्याचे समर्पक स्पष्टीकरण न दिल्यास हकालपट्टीची कारवाई होते. त्यामुळे आता कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पाठवण्यात आलेली ‘कारणे दाखवा’ नोटीस म्हणजे त्यांना हटवण्याची प्रक्रिया असल्याचे शिक्षणतज्ञ सांगत आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच नामुष्की
मुंबई विद्यापीठाच्या १६० वर्षांहून अधिक ऐतिहासिक आणि गौरवशाली वाटचालीत याआधी कधीही राजभवनाकडून कुलगुरूंना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आलेली नाही. मात्र निकाल रखडवल्याप्रकरणी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवल्यामुळे विद्यापीठाच्या विश्वासार्हतेला तडा गेला असून ही नामुष्की असल्याचे बोलले जात आहे.

असा उडतोय निकालाचा गोंधळ
– विद्यापीठाचे १५४ निकाल जाहीर होणे बाकी.
– अजूनही १,८१,५८३ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी.
– ५९,६५५ उत्तरपत्रिकांची फेरतपासणी बाकी.
– घाईत निकाल जाहीर केल्यामुळे टॉपर विद्यार्थ्यांना फक्त १० ते २० गुण दिल्याचे प्रकार उघडकीस.
– फक्त पुरवणी तपासून गुण दिल्याचा काही विद्यार्थ्यांचा आरोप.
– …तर काही विद्यार्थी म्हणतात, आमच्या पुरवणी तपासल्याच नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या