श्रद्धा कपूरच्या ‘हसीना’मध्ये भाऊ साकारणार ‘डॉन’

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या आगामी चित्रपट ‘हसीना’चं एक नवीन पोस्टर ट्विटरवर शेअर केलं आहे. या पोस्टरद्वारे तिने हसीना या चित्रपटातला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याच्या भूमिकेतला सिद्धांत कपूरचा फोटो शेअर केला आहे. ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ या चित्रपटात प्रथमच श्रद्धा आणि सिद्धांत कपूर हे खऱ्या आयुष्यातले सख्खे बहिण-भाऊ मोठ्या पडद्यावरही सख्खी भावंडं म्हणून दिसणार आहेत.

सोशल मीडियावर सिद्धांत कपूरचा डॉनवाला फोटो शेअर करताना तिने त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांचं आहे. यात श्रद्धा कपूर दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे वय वर्ष १८ ते वय वर्ष ४३ असे वयाचे अनेक टप्पे आपल्या अभिनयातून साकारण्याचं आव्हान तिच्यासमोर असेल. हसीना या भूमिकेसाठी श्रद्धाच्या लूकवरही खूप मेहनत करण्यात आली आहे. तसंच या चित्रपटासाठी ८० आणि ९० चा काळ दाखवणारा सेटही डिझाईन केला गेला आहे. ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ येत्या १४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या