तो मला शोधून ठार मारेल! श्रद्धा वालकरची ऑडियो क्लिप न्यायालयात सादर

देशभरात खळबळ उडवलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांनी न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. सोमवारी याप्रकरणावर युक्तीवाद सादर करताना, पोलिसांनी न्यायालयात एक ऑडीओ क्लिप ऐकवली. त्यात आफताब तिची हत्या करणार असल्याचे श्रद्धा बोलतेय.

श्रद्धा वालकर हत्याकंड प्रकरणात सोमवारी पोलीसांनी आफताब पुनावालाविरूद्ध युक्तीवाद केला. आरोपी आफताबला पोलिसांनी साकेत न्यायालयात उभे केले. यावेळी श्रद्धाचे वडिल विजय वालकरही उपस्थित होते. दिल्ली पोलिसांनी आरोपी विरोधात बरेच पुरावे सादर केले. यावेळी श्रद्धाची एक ऑडीओ क्लिपही ऐकविण्यात आली. दिल्ली सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, ही क्लिप सिद्ध करते की पूनावालापासून श्रद्धाला आधीच जीवाला धोका होता आणि तो तिला सतत मारहाण करत असे.

फिर्यादी पक्षाने आरोप सिद्ध करताना प्रॅक्टो अॅपची एक ऑडीओ क्लिप ऐकवली. या ऑडीओ क्लिपमध्ये मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी बोलताना तिने सांगितले की, माझी अडचण ही आहे की, मला आफताब वसईमध्ये शोधून काढेल, या शहरात तो मला कुठूनही शोधून काढेल आणि मला मारून टाकेल. पुढे ती असेही म्हणतेय की, त्याने कित्येकदा मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने पहिल्यांदा मारण्याचा प्रयत्न केला नाही तर याआधीही त्याने असे काही केले आहे. त्याने माझा गळा दाबला होता त्यावेळी मी बेशुद्ध झाले होते. सुदैवाने त्यावेळी मी तिला धक्का दिला पण त्यानंतर तीस सेकंदापर्यंत मी श्वास घेऊ शकले नाही.

दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, आफताब अमिन पुलवालाने 18 मे रोजी आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करुन तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन फेकले.