श्रावण महोत्सव 2019- भव्य पाककला स्पर्धेचा उद्या महाअंतिम सोहळा

458

श्रावण महिन्यातील लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी ‘श्रावण महोत्सव 2019’ या भव्य पाककला स्पर्धेच्या निमित्ताने मिळाली. चविष्ट, नावीन्यपूर्ण आणि पौष्टिक पराठे आणि थेपल्यांच्या विविध रेसिपीज या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळाल्या. आता या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रंगणार असून खाद्य परंपरेबरोबरच श्रावणातील गाणी, शेफच्या टीप्स, धम्माल खेळ आणि बक्षिसांची लयलूट करण्याची संधी स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनादेखील मिळणार आहे. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.

उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशनतर्फे ‘श्रावण महोत्सव 2019’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. सामान्य गृहिणींमधील पाककलेला व्यासपीठ मिळावे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आहे. मुंबई व परिसरात एपूण 11 ठिकाणी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धेच्या विविध फेऱया पार पडल्या. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून सोमवार, 26 ऑगस्टला दुपारी 2.30 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. महाअंतिम फेरीत मुख्य परीक्षक म्हणून हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत असणार आहेत.

श्रावण महिन्याचा आनंद लुटा
महाअंतिम सोहळ्यात गायक नचिकेत देसाई आणि अनुजा वर्तक रसिकांना गाण्याच्या माध्यमातून श्रावणाचा मनमुराद आनंद देणार आहेत. तसेच यावेळी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ सातासमुद्रापार नेण्याचा विडा उचलणाऱ्या पूर्णब्रह्मच्या जयंती कठाळे प्रेक्षकांना भेटायला, त्यांच्याशी संवाद साधायला उपस्थित राहणार असून त्या व्यवसाय क्षेत्रातील स्वतःची यशोगाथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.

विजेत्या स्पर्धकाला थायलंडची सफर
विजेत्याव्यतिरिक्त उपस्थित प्रेक्षकांनाही विविध खेळांच्या माध्यमातून महाअंतिम फेरीत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धकाला केसरी टूर्सतर्फे ‘माय फेअर लेडी’ या थायलंडच्या टूरला जाण्याची संधी मिळणार आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी महाअंतिम सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या