पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीत शिवभक्तांची मांदिआळी

बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र वैद्यनाथ हे अनेक कारणांनी एकमेवाद्वितीय आहे. शिव-शक्ती आणि भक्तीचा त्रिवेणी संगम असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी लावतात. आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त प्रभू वैद्यनाथ नगरीत शिवभक्तांची मांदिआळी दिसून आली. दुपारपर्यंत 50 हजारावर भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. हरहर महादेव, वैद्यनाथ भगवान की जय, ओम नम:शिवाय आदी जयघोषाने मंदीर परिसर दुमदुमुन गेला होता.

कोरोना नंतर दोन वर्षांनी गाभाऱ्यातून श्रींचे दर्शन होत असल्याने आज पहिल्या श्रावणी सोमरनिमित्त देशभरातील भाविक भक्तांनी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रावण सोमवारच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यनाथ देवल कमेटीच्या वतीने दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यनाथ देवल कमेटीच्या वतीने महिला व पुरूषासांठी स्वतंत्र्य रांगाची व्यवस्था केलेली होती. याठिकाणी विशेष दर्शन पासेसची व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यनाथ मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून गेला होता.

पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा करण्यात आली होती. विभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय यांनी रात्री 2.30 च्या सुमारास वैद्यनाथ मंदीरात भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मंदिर परिसरात अंदाजे 270 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सोमवारी रात्री 12 पर्यंत श्रींचे दर्शन भाविकांना घेता येणार असल्याची माहिती वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली आहे. दोन वर्ष गाभाऱ्यातुन दर्शन न होऊ शकल्याने अंदाजे 2 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.

प्रभू वैद्यनाथ नगरीला अनन्यसाधारण महत्व

अध्यात्मीकदृष्ट्या वैद्यनाथ नगरीला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदुचे सर्वात पुण्यवान क्षेत्र म्हणून काशी तीर्थक्षेत्राला महत्व असले तरी परळी क्षेत्राची ओळख काशीपेक्षाही गव्हूभर अधिक असल्याचे पुराणात सांगितले आहे. शैव आणि वैष्णव या दोन पंथातील वाद मिटवणारे वारकरी संप्रदायाचे महान संत जगमित्र नागा यांच्या रूपाने भक्तीचे ठिकाण या ठिकाणी आहे.